Rahul Gandhi: गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील तरुण विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठाने एका प्रकारे धमकी दिली आहे. या धमकीनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा "तुमची हिंमतच कशी झाली" असे म्हणत, "भविष्यात वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही" असा गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्ली विद्यापीठाच्या सूचनेवरून रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत.

Continues below advertisement

दिल्ली विद्यापीठाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "आपली सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कृपया नोंद घ्या की नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियम लागू आहेत. त्यामुळे तेथे कोणतेही बेकायदेशीर जमाव किंवा आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भविष्यातील करिअरच्या संधींवर गंभीर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जंतर मंतरपासून दूर राहावे आणि स्वतःची सुरक्षितता तसेच कायद्याचे पालन करण्याला प्राधान्य द्यावे. याशिवाय, सध्या परिस्थिती चिथावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या/अफवा (Fake Content) पसरवल्या जात आहेत, त्यामुळे सर्वांनी खबरदारी बाळगावी."

विद्यार्थ्यांना धमकावण्याची हिंमतच कशी झाली?

दरम्यान, या ट्विटनंतर राहुल गांधी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या ट्विटवरती हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "दिल्ली विद्यापीठाची जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावण्याची हिंमतच कशी झाली? लक्षात ठेवा, वेळ आल्यावरती यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल." दुसरीकडे, गेल्या 26 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं सुरू असलेलं आमरण उपोषण आज (24 जुलै) मध्यरात्री सुटलं आहे. तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. देशभरातील तरुणही दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर जमली असून त्या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून मोठ्या ताकदीने आंदोलन केलं जात आहे.

Continues below advertisement

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे

सोनम वांगचुक यांना फरफटत रुग्णालयात नेल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांची सालटी सोलून काढली होती. त्यानंतरही विद्यार्थ्यांनी आपला आक्रमक पवित्र कायम ठेवत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षांनीसुद्धा साथ दिली असून कोणत्याही स्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीवरती ठाम आहेत. मात्र, सरकारकडून या विरोधकांच्या कोणत्याच मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सुद्धा आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाची धग देशपातळीवर पोहोचल्यानंतर सरकारकडून बोलणी सुरू झाली आहेत आणि त्यानंतरच सोनम वांगचुक यांचं उपोषण सुटलं आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय कोणत्याही स्थितीत माघार घेणार नसल्याचं विद्यार्थ्यांसह कॉकरोच जनता पार्टीने म्हटलं आहे. दरम्यान, विद्यार्थी आपल्या भूमिकेवर कायम असतानाच दिल्ली विद्यापीठाच्या या धमकी सत्रामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या