नवी दिल्ली: १४ वर्षांच्या इतिहासात अनेक चढ-उतार, यश आणि अंतर्गत कलह पाहणाऱ्या आम आदमी पार्टीमध्ये (AAP) शुक्रवारी मोठा राजकीय भूकंप झाला. संसदीय दलात मोठी फूट पडून पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पक्षात झालेल्या या आजवरच्या सर्वात मोठ्या फुटीनंतरही संकट टळलेले नाही, तर पक्षासमोर आता नवीन चिंता निर्माण झाली आहे.

Continues below advertisement

पक्षापुढील मुख्य आव्हान आता दिल्ली या त्यांच्या सर्वात मजबूत आणि जुन्या गडामध्ये २२ आमदारांना एकत्र ठेवण्याचे आहे. विशेषतः राघव चड्ढा यांनीही पक्षात भविष्यात आणखी फूट पडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. ज्या प्रकारच्या फुटीचे ते सूत्रधार बनले आहेत, त्याकडे पाहता 'आप' आता त्यांच्या वक्तव्याला हलक्यात घेण्याची जोखीम पत्करू शकत नाही.

AAP Split: काहीतरी मोठे घडण्याची शक्यता 

आम आदमी पार्टीने शुक्रवारी सकाळी पंजाबमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावरूनच पक्षात काहीतरी मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे सिद्ध झाले होते. पंजाबमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, 'आप' नेत्यांवरील ईडीचे छापे हे विशिष्ट 'सूचनांनुसार' टाकण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी पुढे सांगितले की, सध्या पक्षाची मुख्य प्राथमिकता दिल्लीतील २२ आमदारांच्या गटाला एकनिष्ठ आणि एकत्र ठेवणे ही आहे.

Continues below advertisement

AAP Split: पक्ष सोडणारे बहुतेक नेते व्यावसायिक

'आप'च्या एका नेत्याने सांगितले की, "ज्या खासदारांनी पक्ष सोडला आहे त्यांच्याकडे पहा. त्यातील बहुतेक जण मोठे व्यावसायिक आहेत. आज ज्यांनी पक्षाची साथ सोडली, त्यातील अनेक जण २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी 'आप'च्या जास्तीत जास्त नेत्यांना आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न करत होते."

AAP Split: अशोक मित्तल यांच्या ठिकाणांवर ईडीची कारवाई

१५ एप्रिल रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (FEMA) सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात अशोक मित्तल यांच्याशी संबंधित ठिकाणांची झडती घेतली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीच्या दिल्लीस्थित मुख्यालय तपास युनिटने जालंधर आणि गुरुग्राममधील १० ठिकाणांवर समन्वित शोधमोहीम राबवली. यामध्ये 'लव्हली ग्रुप'चा भाग असलेल्या 'कॉलेज ऑफ बिझनेस' आणि 'मास्टर्स युनियन स्कूल ऑफ बिझनेस'शी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. मित्तल यांच्या परिसराचीही झडती घेण्यात आली होती. ही कारवाई ग्रुपशी संबंधित संस्थांच्या व्यापक तपासाचा भाग असल्याचे ईडीने स्पष्ट केले होते.

AAP Split: दिल्लीतील संघटन टिकवून ठेवण्याचे आपसमोर आव्हान

पक्षांतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता आम आदमी पार्टीसमोर दिल्लीतील आपले संघटन टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. याशिवाय, पक्ष सोडून गेलेल्या सात नेत्यांच्या जागी नवीन सक्षम नेत्यांची ओळख पटवणे ही आता पक्षाची प्राथमिकता आहे.

AAP Split: राघव चड्ढा दिल्लीतून आमदार राहिलेले आहेत

सात खासदारांसह पक्षातून बाहेर पडलेले राघव चड्ढा म्हणाले की, "सध्या तर राज्यसभेतील पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांनी पक्ष सोडला आहे, पण अजून बरेच लोक आमच्यासोबत येणार आहेत." त्यांनी पक्षात भविष्यात आणखी फूट पडण्याची दाट शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. राघव चड्ढा यांच्या या संकेतानंतर आपमधून आणखी काही नेते फुटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.राघव चड्ढा हे दिल्लीतून आमदार राहिलेले आहेत. पंजाबमध्ये पक्षाचे कामकाज पाहण्यापूर्वी ते दिल्लीत अत्यंत सक्रिय होते. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने ही फूट घडवून आणली आहे, ते पाहता त्यांचे शब्द आम आदमी पार्टीसाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत.