Radhakrishna Vikhe Patil : राज्यात नद्यांच्या प्रदूषणाला (River pollution) महापालिका (Municipal Corporation) जबाबदार असून ते सर्व घाण पाणी थेट नद्यात सोडतात आणि त्यामुळेच नद्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट बनत चाललेली असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. सांगोला येथे आयोजित 21 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यात सुरू केलेल्या नद्याजोड प्रकल्प, धरणातील गाळ काढणे, वाढते नागरिकीकरणामुळे शेतीच्या पाण्याचा तुटवडा अशा अनेक विषयांवर शासनाच्या भूमिका मांडल्या. या सिंचन परिषदेतून तज्ञांनी सरकारला सूचना द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करताना यानंतर आम्ही याचा रोड मॅप बनवू असे त्यांनी सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यातील महापालिका निधी असूनही त्यांचे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट न करता नद्यात सोडत असल्याने नद्यांचे प्रदूषण वाढत चालले आहे. यासोबत नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडूनही अशाच पद्धतीची कृती होत असली तरी या लहान संस्थांकडे निधी नसल्याने आता यांनी सोडलेले पाणी एकत्रित करून त्यावर जलसंपदा विभाग ट्रीटमेंट करण्याच्या विचारात आहे. यामुळे नदीत येणारे पाणी स्वच्छ आल्यास प्रदूषण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, सध्या वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. आत्ताच ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाचे वेळापत्रकही बदलू लागले आहे. अशावेळी धरणात असलेल्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन होण्यासाठी आता राज्यातील धरणांच्या पाण्यावर राज्य सरकार फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्याची तयारी करीत आहे. यासाठी एनटीपीसी सारख्या भारत सरकारच्या कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली असून धरणात मुबलक जागा असल्याने या ठिकाणी पाण्यावर फ्लोटिंग सोलर पॅनल बसविल्यावर पाण्याचे बाष्पीभवन ही कमी होईल आणि निर्माण होणाऱ्या सोलर एनर्जीमधून जलसंपदा विभागाला उत्पन्नही मिळेल असे त्यांनी सांगितले. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना प्रत्येकाने संयम बाळगला पाहिजे असा सल्ला विखे पाटील यांनी माणिकराव कोकाटे यांना दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या