Chhatrapati Sambhajinagar: विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या नेत्यांच्या दौऱ्यात दररोज काही न काही निदर्शनं, आंदोलनं, राडे घडताना दिसत असताना या सगळ्या प्रकरणांमध्ये बड्या नेत्यांची मुलं सहीसलामत सुटली आणि कार्यकर्ते मात्र, पोलिसांच्या कचाट्यात अडकले असल्याचे चित्र सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसत आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले व त्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली होती. यात काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनात सहभागी बड्या नेत्यांची मुलं सहीसलामत सुटली आहेत. पण कार्यकर्ते मात्र पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे दिसून आले.


नक्की काय झाले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये?


छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे आले असता त्यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले. या विरोधाला प्रत्युत्तर  देत शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे जिंदाबाद च्या घोषणा दिल्या. घोषणाबाजीने वातावरण अधिकच तापले व दोन्ही गट एकमेकांवर धावून गेले. या घटनेत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या राड्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी येऊन भाजपच्या कृतीचा निषेध केला. खाली बसून त्यांनी ठिय्या धरला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांना हलवल्याचे समजते. ते म्हणाले, "काल या संदर्भात सिपिंना फोन केला होता पण त्यांनी लक्ष दिल नाही या घटनेला पोलीस जबाबदार आहेत."


भाजप शिवसेनेच्या राड्यात बड्या नेत्यांची मुलंही सहभागी


शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये थांबले असता तिथे त्यांना जाब विचारण्यासाठी भाजपकडून आंदोलन  करण्यात आलं. या आंदोलनात भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन कराडही सहभागी झाला होता. कराड यांच्या भगिनी देखील आंदोलनामध्ये सहभागी होत्या. कराड यांच्या मुलांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिल्या. दुसरीकडे अंबादास दानवे यांचा मुलगा धर्मराज हा देखील आंदोलनात सहभागी होता. यात दानवेंचा भाऊही होता. त्यानंतर तिथे राडा झाला भाजप आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, पोलिसांना बळाचा वापर करत सौम्य लाठीमार करावा लागला पोलिसांनी उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजपाच्या 32 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. मात्र यावेळी भाजपाच्या गुन्हा दाखल केलेल्या लोकांची लिस्ट पाहिली तर त्यात हर्षवर्धन कराड यांचं नाव दिसलं नाही. तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले त्यात दानवे यांचा मुलगा आणि भाऊ यांचं  नाव दिसत नाही त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला नेत्याची मुलं आणि गुन्हे मात्र सामान्य कार्यकर्त्यांवर असं चित्र आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यावर पाहायला मिळालं. 


हेही वाचा:
आदित्य ठाकरेंच्या हॉटेलबाहेर राडा, शिवसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांना भिडले, पोलिसांचा लाठीचार्ज