Pune Bypoll election : जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र हे आरोप भाजपवर नाही आहे. तर हे आरोप मतदारांवर आहे की, मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदारांचा असं अपमान करण्याचा कुठला  ही अधिकार काँग्रेस एनसीपी पक्षाला नाही. पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षानं (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे (Kasba Constituency) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ''आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, मात्र पैसे वाटणार नाही. मतदारच आम्हाला वारंवार जिंकून देतात. कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत. हे माहीत पडल्यानंतर असा रडीचा डाव सुरू झालेला आहे. कसबामध्ये आचारसंहितेचा खुलं उल्लंघन करण्यात आलं आहे.''


एकनाथ शिंदे सुरतला निघून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन करत मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''जे सांगायचंय ते मीच सांगितलं आहे. मात्र अशा गोष्टींवर रोज चर्चा करायची नसते. त्याची योग्य वेळ असते. योग्य वेळी सगळ्याच गोष्टी सांगू, असेही त्यांनी म्हटले.


औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकाराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता या जिल्ह्याचे नाव बदलणार आहे. यावरून आदित्य ठाकरे यांना टोला लगावत ते म्हणाले आहेत की, ''काही लोकांना असं वाटते की सर्व काही त्यांच्याच काळातलं आहे. त्यांचा काळ अडीच वर्षाचा होता. अडीच वर्षात सव्वा दोन वर्ष ते दाराचे आत होते. त्यामुळे त्यांना जो काही कालावधी मिळाला, त्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल, असे त्यांना वाटते. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वातील आमच्या सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर हे नाव औरंगाबादला, तर धाराशिव हे नाव उस्मानाबादला दिलं आणि प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले. ते केंद्राने मान्य केले. आम्ही नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कदाचित आदित्य ठाकरे असेही म्हणू शकतात की, त्यांच्या सांगण्यामुळेच मोदींनी हे प्रस्ताव मान्य केले.''


दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री राजेश पांडे यांनी ही माहिती दिलीय. रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन करुन आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि धंगेकरांच्या सभेत धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून पैशांचा वापर सुरु आहे, असा आरोप करत रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर आंदोलन केलं.  मात्र या आंदोलनात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप भाजपने केलाय.