सोलापूर: विरोधकांच्या मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होऊ नये यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण बैठकीला ते स्वतः न येता ज्युनिअर नेत्यांना पाठवायचं आणि अपमानास्पद वक्तव्य करायची असा प्रकार सुरू ठेवला असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) मी माझ्यासोबत चर्चा करा असं कधीच म्हटलं नव्हतो असंही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. 


'एबीपी माझा'च्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर खोचक टीका केली होती. पृथ्वीराज चव्हाणांना कांग्रेस पक्षातच कोण विचारत नाही, मग आम्ही त्यांच्याशी का बोलावं, मी माझ्या स्टेटसच्या नेत्यांशी चर्चा करणार असं आंबेडकर म्हणाले होते. त्यावर माझ्यासोबत बसून चर्चा करा असं कधीही बोललो नसल्याचा पलटवार पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय.


काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 


प्रकाश आंबेडकरांना जर काँग्रेसला भाजपची ए म्हणायचं असेल तर म्हणू द्या, लोकांनाही ते पटले पाहिजे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत देशभरातून 19 टक्के मतं मिळाली होती. ज्या पक्षाला काही टक्के मते मिळाली ते जर असे बोलत असतील तर काय बोलणार.   


मी कधीच म्हणालो नाही की प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत बसावं आणि चर्चा करावी. मी कायम म्हणालो की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत आणि प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करा. प्रकाश आंबेडकर सोबत आले पाहिजे होते, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र ते स्वतःच आले नाहीत. 


वंचितकडे आता दोन टक्के मतं


गेल्या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित आघाडी सोबत असल्याने त्यांना सात टक्के मतं मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसच्या सोलापूरसह सात जागा पडल्या होत्या. पण आता वेगळी परिस्थिती आहे. एमआयएम सोबत नसल्याने त्यातील चार ते पाच टक्के मतं कमी झाली आहेत. उरलेली दोन टक्के मतं ही वंचितची आहेत. 


या निवडणुकीचं सूत्र हे विरोधकांच्या मताचं विभाजन टाळण्याची जबाबदारी होती. आमच्या पक्षाने वंचितला सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न  केला. कुठल्या जागा पाहिजेत हे विचारलं. पण वंचितने व्यवहारिक जागा मागितल्या पाहिजे होत्या. तीन पक्षांची आघाडी असताना काही अडचणी असतात. स्वतः बैठकीला यायचं नाही, कुठल्यातरी ज्युनिअर नेत्याला पाठवायचं, सतत अपमानास्पद वक्तव्य करायची हा प्रकार सुरू होता. 


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सोलापूरमध्ये महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे. प्रणिती शिंदे यांना मोठा पाठिंबा मिळतोय. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून वैयक्तिक संपर्काचा त्यांना फायदा होतोय. 


भाजपला वस्तुस्थिती समजल्याने द्वेषाची वक्तव्य


देशभरात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून त्यामध्ये सर्व काही ठिक नाही हे भाजपला समजलं आहे. त्यामुळेच लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून, विकासाचे प्रश्न सोडून द्वेषाचं वातावरण करत आहेत. मोदी सातत्याने तशा प्रकारची वक्तव्य करताना दिसत आहेत.


ही बातमी वाचा: