Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते.  


शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही?


फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. 


ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले. 


राज ठाकरेंनी कॉन्ट्रॅक्ट घेतल्याचे वाटते 


चव्हाण यांनी सांगितले की, 2019 मध्ये पंतप्रधानांनी सात सभा घेतल्या होत्या. आता 20 च्यावरती सभा झाले आहेत. मनसेनं ही सभा आयोजित केली आहे याचा आश्चर्य वाटतं. मागील निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींवर सडकून टीका केली होती आता ते सभेला बोलवतात. ते म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटले, मी तसं म्हणणार नाही.  मात्र, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे असं वाटतं. त्यांनी कोणाची मदत घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यावं, अजित पवारांना सोबत घ्यावं की प्रकाश आंबेडकरांची अप्रत्यक्ष मदत घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. 


असा जिरेटोप घालणं योग्य नाही


मराठी माणसाची मानसिकता माहीत नाही म्हणून प्रफुल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातला. एका गुजराती व्यक्तीने दुसऱ्या गुजराती व्यक्तीला असा जिरेटोप घालणं योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.