PM Modi Meets Business Leaders: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. आज ते जपानची राजधानी टोकियो येथे पोहोचले आहेत. जेथे पंतप्रधान मोदींचे जपानच्या लोकांनी भव्य स्वागत केले. क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जपानमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन दिवसीय जपान दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जपानमधील प्रमुख व्यावसायिकांची भेट घेतली. क्वाड समिट 2022 च्या आधी, पंतप्रधानांनी जागतिक मान्यता मिळविलेल्या मोठ्या जपानी कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली.


जपानी उद्योगपतींसोबत पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, पंतप्रधान मोदींनी टोकियोमध्ये NEC कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो एंडो यांची भेट घेतली. संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील NEC च्या भूमिकेचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि NEC प्रमुखांनी भारतात व्यवसाय करण्याचे मार्ग अधिक सुलभ करण्यासाठी औद्योगिक विकास, कर आणि कामगार यासह अनेक सुधारणांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर NEC प्रमुख म्हणाले, "आज आम्हाला पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्याची चांगली संधी मिळाली. आम्ही डीएक्स कसे लागू करावे आणि स्मार्ट शहरांमध्ये योगदान कसे द्यावे, याबद्दल चर्चा केली. 


पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मोदी आणि जपानच्या सर्वात मोठ्या टेक्सटाईल ब्रँड Uniqlo चे सीईओ तादाशी यानाई (Tadashi Yanai) यांच्या भेटीसंदर्भात एक ट्वीट केले आहे. पीएमओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जपानच्या आघाडीच्या टेक्सटाईल ब्रँड युनिकलोचे अध्यक्ष आणि सीईओ तादाशी यानाई यांची भेट घेतली. या भेटीत यानाईने भारतीयांच्या उद्योजकतेचे कौतुक केले. यानाईसोबतच्या या भेटीत पंतप्रधान मोदींनी त्यांना कापड उद्योग अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पीएम -मित्र योजनेत सहभागी होण्यास सांगितले. दरम्यान, पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अ‍ॅपेरल (पीएम मित्र) योजनेचा उद्देश हा केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीचे विशेष उद्देश वाहन आहे. याद्वारे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे कापड उद्योगाचा विकास करणे आहे.