Presidential Election Result: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठा विजय मिळवला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांचे एका ट्विटमध्ये अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आदिवासी समाजाची मुलगी राष्ट्रपती म्हणून निवडून आल्याने भारताने इतिहास लिहिला आहे. द्रौपदी मुर्मूंचे जीवन एक आदर्श असून त्यांचे यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देईल. त्या नागरिकांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास आल्या आहेत.


मोदी म्हणाले की, “ज्या वेळी 1.3 अब्ज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहेत, अशा वेळी पूर्व भारतातील दुर्गम भागातील आदिवासी समाजात जन्मलेली भारताची मुलगी आमची राष्ट्रपती म्हणून निवडून आली आहे. या विजयाबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचे हार्दिक अभिनंदन.''






पंतप्रधान म्हणाले की, द्रौपदी मुर्मू या एक उत्तम आमदार आणि मंत्री राहिल्या आहेत. झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांचा कार्यकाळ गौरवशाली राहिला आहे. मला खात्री आहे की, त्या एक उत्कृष्ट राष्ट्रपती ठरतील, ज्या स्वतः पुढे येऊन देशाचे नेतृत्व करतील आणि भारताचा विकास प्रवास आणखी मजबूत करण्यास मदत करतील. ते म्हणाले की, मी पक्षाच्या बाहेरील सर्व खासदार आणि आमदारांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. त्यांचा विजय हा आपल्या लोकशाहीसाठी चांगला संकेत आहे.

 

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा सामना विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी झाला होता. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मुर्मू यांनी आघाडी घेतली होती. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने प्रत्येक राज्यात जल्लोषाची तयारी केली आहे.