मुंबई: मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक (Pratap Sarnaik Son Vihang Sarnaik) यांची एमसीएच्या अध्यक्षपदी लॉबिंग करण्याकरिता जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विद्यमान एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर मंत्री आशिष शेलार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा अजिंक्य नाईक यांना मात्र पुन्हा अध्यक्ष होण्यास विरोध आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Pratap Sarnaik Son Vihang Sarnaik) 

Continues below advertisement

pratap sarnaik meets Sharad Pawar: सरनाईकांनी मुलासोबत घेतली होती शरद पवारांची भेट

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट घेतली होती. सरनाईक यांचा मुलगा विहंग हा ‘मुंबई क्रिकेट असोशिएशन’च्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. या संघटनेतील पवारांचे असणारे राजकीय वर्चस्व पाहता सरनाईक यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते. परिवहन मंत्री सरनाईक यांनी पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र तथा मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक होते. पवार यांना भेटून बाहेर पडताना सरनाईक यांनी ‘दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवारांची भेट घेतली’ असे माध्यमांना सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिंदे शिवसेनेचे आमदार किरण सामंत तसेच भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड हे इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. अलीकडेच या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. सध्या असोसिएशनचे अध्यक्षपद अजिंक्य नाईक यांच्याकडे असून, ते पवार गटाशी संबंधित आहेत. मागील निवडणुकीत भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांच्या पाठिंब्याने उभा राहिलेला उमेदवार पराभूत झाला होता. त्यामुळे या वेळी निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय रस्सीखेच रंगण्याची शक्यता आहे. ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’वर कायमच राजकीय नेत्यांचे प्रभाव आणि वर्चस्व राहिले आहे.

Continues below advertisement

vihang sarnaik: विहंग सरनाईक कोण आहेत ?

विहंग सरनाईक हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. विहंग हे एकेकाळी अखंड शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. सध्या ते ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’चे सदस्यही आहेत.