Prakash Mahajan Resign : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan Resign) यांनी राजीनामा देत मनसेला रामराम केला आहे. त्यांनी प्रवक्तेपदाबरोबरच पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा होती. काही महत्त्वाच्या कार्यक्रमांपासून आणि मेळाव्यांपासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचे बोलले जात होते. नाशिकच्या मेळाव्याला त्यांना बोलावले गेले नाही, तसेच प्रवक्तेपद असूनही काही वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या. यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मध्यंतरी महाजन यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यातून फारसे यश आले नाही. गेल्या काही काळापासून ते मनसेच्या प्रमुख कार्यक्रमांपासून लांब राहात होते. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांंच्या या निर्णयानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांची खदखद व्यक्त केली आहे.
दोन भाऊ आम्हालाच विसरून गेले
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले नाही तर नियती त्यांना माफ करणार नाही, असं काही दिवसांपूर्वी प्रकाश महाजन यांनी म्हटलं होतं. हे वक्तव्यच तुमच्यासाठी राजीनाम्याचे कारण ठरले का? या एबीपीच्या प्रश्नावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, मी असलो काय आणि नसलो काय? माझी प्रामाणिक भूमिका होती की, दोन्ही भावांनी एकत्र यावं. माझ्या वक्तव्याविषयी तेव्हा मला खूप ऐकावे लागले. पण, शेवटी दोन भाऊ एकत्र आलेच ना. त्यावेळेस माझी कुणाला आठवण झाली नाही की, मी अशी भूमिका घेतली होती. मी जोपर्यंत तिथे होतो मी प्रामाणिकपणे काम केले. मी दोन महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि आज दोन भाऊ एकत्र आले ही चांगलीच गोष्ट आहे. नाशिकमध्ये इतका मोठा मोर्चा निघाला. आता दोन भाऊ आम्हालाच विसरून गेले, त्याला आम्ही काय करू शकतो? असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.
माझा बाकी कोणावर राग नाही
माझा थोडं वय वाढलं आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा बाकी कोणावर राग नाही असे त्यांनी म्हटले. नारायण राणेंना आव्हान देणे तुम्हाला भावलं का? असे विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, नाही तसे काहीही नाही. कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे मी थांबलेलो आहे. बाकी काहीही नाही, असे देखील त्यांनी सांगितले.
या वयात मनस्थिती चांगली राहिली पाहिजे
तुमचा कुठल्या गोष्टीवर आक्षेप आहे? याबाबत विचारले असता मी अत्यंत लहान प्रवक्ता आहे. माझा काय आक्षेप असणार? मी कुठल्याही मोठ्या पदावर नव्हतो. माझ्यासारखा छोटासा प्रवक्ता राहिला काय आणि गेला काय? फार मोठा परिणाम होणार नाही. पण या वयात आपली मनस्थिती चांगली राहिली पाहिजे म्हणून मी ठरवले की, आता या सर्व गोष्टींपासून आपण दूर जावे, असे प्रकाश महाजन म्हणाले.
आपणच बाहेर पडलेले काय वाईट
तुमच्या मनाविरुद्ध नेमकं काय घडलं? याबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, काही गोष्टी आहेत. कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा आपणच बाहेर पडलेले काय वाईट आहे. बाकी कुणावर राग असण्याचे कारण नाही. वाईट या गोष्टीचे वाटते की, मी अमित ठाकरे यांना दिलेला शब्द पाळू शकलेलो नाही, असे त्यांनी म्हटले.
स्थापनेपासून पक्षात सक्रीय
प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे भाऊ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय होते. मराठवाड्यातील प्रमुख नेता म्हणून त्यांचा प्रभाव मानला जायचा. टीव्ही डिबेट शोमध्ये ते मनसेची बाजू ठामपणे मांडायचे. अलीकडेच त्यांचा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत शाब्दिक वाद रंगला होता. विशेष म्हणजे, राणे आणि राज ठाकरे यांच्यात दृढ मैत्रीपूर्ण संबंध आहेत. प्रकाश महाजन यांनी पक्ष सोडण्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यांच्या अस्वस्थतेमागे ही सर्व कारणे असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसला आहे.