मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवार यादीमध्ये एकूण 11 जणांचा समावेश आहे. वंचितच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही समाजातील सर्व जाती-घटकांना स्थान मिळेल, याची काळजी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे वंचितच्या दुसऱ्या यादीतही लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे. वंचितच्या पहिल्या लोकसभा उमेदवार यादीत 8 जणांचा समावेश होता, तर दुसऱ्या उमेदवार यादीत 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे वंचितने आतापर्यंत लोकसभेचे 19 उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीसोबत युतीची बोलणी सुरु असताना प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेच्या 27 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे विजय मिळवण्याइतपत ताकद असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आतापर्यंत वंचितने 19 लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत. 



वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीतील लोकसभेचे उमेदवार कोण?


हिंगोली - डॉ. बीडी चव्हाण   - बंजारा
लातूर - नरिसिंहराव उदगीरकर - मातांग
सोलापूर - राहुल काशिनाथ गायकवाड - बौद्ध
माढा - रमेश नागनाथ बारसकर - माळी (लिंगायत)
सातारा - मारुती धोंडीराम जानकर - धनगर
धुळे - अब्दुर रहमान - मुस्लीम
हातकलंगणे - दादासाहेब दादागौडा चौगौडा पाटील - जैन
रावेर - संजय पंडीत ब्राम्हणे - बौद्ध
जालना - प्रभाकर देवमन बकले - धनगर
मुंबई उत्तर मध्य - अबु हसन खान - मुस्लीम
रत्नागिरी सिंधुदुर्ग - काका जोशी - कुणबी


नाना पटोलेंवर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप


प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी झालेल्या पत्रकार  परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. नाना पटोले यांनी भाजपशी छुपी युती केली आहे. कोल्हापूर आणि नागपूर मतदारसंघात वंचितने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र, नागपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, यासाठी ते दु:खी आहेत. नितीन गडकरी पराभूत होतील, याचे दु:ख नाना पटोले यांना झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन जागांवर पाठिंबा द्यावा, यासाठी डायरेक्ट आमच्यासाठी संपर्क केला. याचे दु:ख पटोलेंना झाले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियातून लोकसभा निवडणूक लढता येणार नाही, असे पक्षाला सांगितलं. नाना पटोलेंनी लढण्यास कशामुळे नकार दिला. याचे खरे कारण आज आपणा सर्वांसमोर आले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.


 


आणखी वाचा:


वंचित बहुजन आघाडीने केले एमआयएमसाठी कायमस्वरूपी दार बंद? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले....


मोठी बातमी: आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात; नवनीत राणांना कडवी टक्कर?