मुंबई: महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही असं खासदार संजय राऊत म्हणतात, पण संजय राऊत खोटं बोलतात असा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये आपापसात मतभेद असल्यानेच जागावाटप रखडले आहे. त्यामुळे त्यानी पहिला मतभेद मिटवावेत, आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे, काँग्रेसने त्यांचा इगो बाजूला ठेवावा असंही ते म्हणाले. नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र बोगस असून त्यांनी आता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराही त्यांनी दिला. 


रखडलेल्या जागावापपाला वंचित जबाबदार नाही


महविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा रखडली असून त्यासाठी वंचित जबाबदार नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते म्हणाले की, मविआमध्ये 10 जागेवरून मतभेद सुरू आहेत. पाच जागा अशा आहेत त्यावर तिन्ही पक्षात शेअरिंग होत नाही. पाचही जण जागा मागत आहेत. 


महाविकास आघाडीमधील भांडण जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत जागावाटप होणार नाही, संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात असं सांगत आधी तुमच्यातील भांडण मिटवा असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस प्रभारी रमेश यांना मी पत्र लिहिलं आहे. सगळी हकीकत मी लिहलं आहे. आम्ही समजोता करायला तयार आहे पण त्यांच्याकडून अजून उत्तर आलेलं नाही. महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आम्ही करतो.


नवनीत राणा यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी


नवनीत राणा या बिगेस्ट फ्रॉड असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राणांचे जात प्रमाणपत्र हे बोगस असून काही दिवसात त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे, त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 


महाविकास आघाडीकडून वंचितला पाच ते सहा जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण कोणत्या जागा सोडायच्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या आधी अनेकदा बैठका घेऊनही महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली. 


दरम्यान, प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी वंचितकडून सुजात आंबेडकरांना तिकीट देण्यात यावं असा ठरावही पास करण्यात आला आहे.


Prakash Ambedkar PC Amravati : संजय राऊत खोटं बोलता, नवनीत राणा जेलमध्ये जाणार, आक्रमक पत्रकार परिषद