नवी दिल्ली: मी मुख्यमंत्री असल्यापासून माझा एक मंत्र आहे, तो म्हणजे मला गुजरातचा विकास करायचा आहे. कारण गुजरातचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे माझे मत होते, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी केले. ते सोमवारी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्र सरकार अनेक राज्यांच्या विकासात अडथळे आणत असल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मला देशाचा विकास करायचा आहे, त्यामुळे गुजरातचा विकास करणे आवश्यक आहे, हे माझे मुख्यमंत्री असल्यापासूनचे धोरण आहे. त्यावेळी केंद्रात युपीए सरकार होते. तेव्हाही गुजरातचा विकास का करायचा, यामागील माझी भूमिका स्पष्ट होती. गुजरातचा विकास झाला तर भारताचा विकास होईल. त्यामुळे आपल्या देशात विकासाचे वातावरण निर्माण होईल, अशी आपली त्यावेळची धारण होती. त्यामुळे कोणत्याही राज्याची विकासाच्या मुद्द्यावर अडवणूक होईल, असा विचार मी कदापि करणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


भाजप पक्ष हा देशातील विविधतेचा पुरस्कार करणारा आहे. प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य दिले पाहिजे, हे भाजपचे धोरण आहे. प्रादेशिक आकांक्षा नाकारुन विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी निक्षून सांगितले. मी दीर्घकाळ गुजरातचा मुख्यमंत्री राहिलो आहे. एखाद्या राज्यात मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा इतक्या वर्षांचा अनुभव असलेला मी देशातील पहिलाच पंतप्रधान आहे. त्यामुळे मला राज्यांना केंद्र सरकारकडून काय अपेक्षा असतात? केंद्राशी वाटाघाटी करताना राज्यांना काय समस्या येतात, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. मी या सगळ्या समस्यांचा सामना केला आहे. त्यामुळे कोणत्याही राज्याच्या विकासात अडथळा यावा, अशी कामना मी कधीच करणार नाही. मी सर्व राज्यांना मदत करायला तयार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 


 




सर्व राज्यांच्या सहकार्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढाईत यश मिळालं: पंतप्रधान मोदी


कोरोना काळाती मी इतक्या वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. प्रत्येक निर्णय सर्व राज्यांशी चर्चा करुन घेण्यात आले. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला यश मिळाले, ही बाब मी जाहीरपणे सांगतो. देशाचा विकास करायचा असेल तर स्पर्धात्मक सहकारी संघराज्याचे धोरण गरजेचे आहे. मला जी 20 परिषद फक्त दिल्लीत घेता आली असती, पण मी ती विविध राज्यांमध्ये घेतली, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


आणखी वाचा


काँग्रेसच्या 50 वर्षातील कामापेक्षा माझी 10 वर्षातील कामगिरी सरस; पंतप्रधान मोदींचा छातीठोक दावा