PM Modi 75th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या वयाची 75 वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपच्या धोरणानुसार ते राजकारणातून निवृत्त होतील का, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) यापुढंही भाजपचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्रात तर आज जणू मोदीमय वातावरण आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये विशेष लेख लिहून मोदींबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळातही भाजपची धुरा आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडेच राहील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये लेख लिहले आहेत. एकनाथ शिंदेंकडून सर्व प्रमुख दैनिकांमध्ये फुल पेज जाहिराती देण्यात आल्या आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी 'माय मोदी स्टोरी'कँपेनमध्ये मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भाजपकडून राज्यात विविध शहरांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे निवृत्त होणार नसून यापुढेही तेच आमचे नेते राहतील, असा संदेश राज्यातील नेत्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर कर्मयोगी नेता' या मथळ्याखाली लेख लिहला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. गरीब कल्याणासह देश सुधारणांच्या नव्या वाटेवर स्वार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनिक लोकसत्तामध्ये पंतप्रधान मोदींचं अभिष्टचिंतन करणारा लेख लिहिला आहे. 'जनतेचा नेता, जगाचा आदर्श' अशा मथळ्याखाली त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी लेख लिहला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मोदींचं कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असतं असं शिंदेंनी आपल्या लेखात म्हटले आहे. मोदींनी दिलेला संदेश आपल्यासाठी कायम मार्गदर्शक असतो, असेही एकनाथ शिंदे यांनी या लेखातून सांगितले आहे.
आणखी वाचा