बीड : लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुडे (Pankaja munde) यांचा 6 हजार मतांनी पराभव झाला. त्यांच्या पराभवाचे पडसाद संपू्र्ण जिल्ह्यात उमटले असून शिरुर, पाथर्डी, परळीसह अनेक ठिकाणी बंदही पुकारण्यात आला होता. या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्याही दोन घटना घडल्या आहेत. आता, दिल्लीतील शपथविधी सोहळा आणि पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये (Beed) परतल्या आहेत. त्यानंतर, आज त्यांनी आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी, त्यांना डोळ्यातील अश्रू रोखणे कठीण झालं झालं. शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करताना पंकजा यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. 


लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी जाऊन पंकजा यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिंचेवाडी येथील युवक पोपट वायभासे यांनी पराभवाचा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर, आज पंकजा मुंडे यांनी वायबसे यांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मात्र, घरातील शोकाकुल वातावर आणि पंकजा मुंडेंना पाहून कुटुंबातील सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी, पंकजा मुंडेंनाही आपले अश्रू रोखणे अनावर झाल्याचं दिसून आलं. पंकजा मुंडे घरी पोहोचताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला, त्यानंतर पंकजा मुंडे यांनाही अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. 



धनंजय मुंडेंनीही घेतली भेट


बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला. त्यामध्ये, पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाली. आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावरच अश्रू ढाळले. तर, बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले. काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवले. त्याच आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबीयांच भेट घेऊन पंकजा मुंडेंनी अश्रू पुसले. दरम्यान, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या पोपटराव वायभासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली. 


दोन्ही मुलांच्या नावे अडीच लाखांची मुदत ठेव


मृत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले. दोन्हीही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मुदत ठेव देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने पोपटराव यांच्या मुलांना देण्यात येत आहे.यावेळी शिवा शेकडे, सुधीर भाऊ पोटे, प्रदीप वायभासे, सचिन वायेभासे, सचिन घुले, प्रा कैलास वायभासे, विलास वायभासे, युवराज वायभासे देवळली चे सरपंच पोपट शेकडे, गंगादेवी चे सरपंच विठ्ठल नगरगोजे, दत्तू शेकडे आदी उपस्थित होते.


हेही वाचा


विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं