Lakshman Hake On Manoj Jarange:मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत महाराष्ट्राच्या निवडणूकीत 288 जागा पाडण्यासाठी उत्सूक असलेल्या मनोज जरांगे यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या 'माघार' निर्णयावर ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. 'जरांगे नावाचं वटवाघूळ स्वत:च्या औकातीवर आलं'. असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांच्या पाडापाडीच्या भूमिकेवरही हाकेंनी घणाघात केल्याचं दिसलं.


जरांगे पाटील यांनी काही मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता पूर्णपणे माघार घेतल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना घेरल्याचं दिसून आलं. कालही त्यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती. 'जे उमेदवार देणार आहेत, तेथील उमेदवार त्यांना येऊन भेटलले आहेत. म्हणून त्या मतदारसंघांची नावं घेऊन मोकळे झाले आहेत. मला वाटतं तिथंदेखील उमेदवार मिळणार नाहीत. मिळाले तर एकदम तकलादू असतील. कोणाला तरी पाडण्यासाठी, कोणाला तरी निवडून आणण्यासाठी बारामतीच्या सांगण्यावरुन उमेदवार दिले असतील. त्यांच्या या उमेदवारांमध्ये काही ताकद नाही," अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती..


काय म्हणाले लक्ष्मण हाके?


मी नेहमी सांगत आलो होतो,ते निवडणूक लढणार नाहीत,किंवा सामोरे जाणार नाहीत. बारामती स्क्रिप्ट नुसार ते वागत आहे. जत्रा भरवण सोप असत लढण अवघड असत. लोकसभेला बारामती सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला.आज ओबीसी एकवटला त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे.बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून माघार घेतली आहे. राणांना लढायला वाघाचं काळीज लागतं गनिमी काव्याचा काळ गेला. असं लक्ष्मण हाके म्हणाले.


राजकीय प्रक्रिया हाताळणं सोपी गोष्ट नाही- जरांगे


एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढे ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असंही जरांगे यांनी सांगितलं. 


राज्यात आता पुढे काय होणार?


दरम्यान, जरांगे यांच्या या भूमिकेनतर राज्याच्या राजकारणात आता सगळं गणित बदलणार आहे. निवडणूक लागण्यापूर्वी जरांगे यांनी निवडणुकीत सक्रियपणे उतरण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी बदलत्या राजकीय समिकरणाचा विचार करून आपली रणनीती आखली होती. मात्र त्यांनी आता थेट निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे