पुणे : ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून सध्या राज्यात चर्चेत असलेल्या लक्ष्मण हाकेंचे (Laxman Hake) अनेकदा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यापूर्वी, त्यांचा दारुच्या नशेतील तथाकथित एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तर मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्याबद्दल टीकात्मक बोलल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता, पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लीप व्हायरल (Viral) होत असून एका युवकाकडे पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे त्यातील संभाषणावरुन दिसून येते. सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचेही संभाषणातून पाहायला मिळते. आता, या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगवर लक्ष्मण हाकेंनी खुलासा केला आहे. तसेच, सातत्याने मला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक असे केले जात असल्याचेही हाकेंनी म्हटलं.
मला 1 मिनिटांत 15 ते 20 कॉल धमक्या देणारे येतात, त्याच प्रकारातून मला बदनाम करण्याचा डाव आखून अशाप्रकारे फोनवरुन संभाषण साधण्यात येते, असा खुलासा लक्ष्मण हाकेंनी व्हायरल व्हिडिओ कॉलसंदर्भाने केला आहे. ''मला ठरवून बदनाम करण्याचा हेतू बाळगला जात आहे. कारण, मी त्यांना पैसे मागण्यासाठी फोन केला नव्हता. त्यामुळे, पैसे देऊ करणाऱ्या माणसाचा हेतू काय होता हे पाहायला पाहिजे. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. पण, लक्ष्मण हाकेला कितीही बदनाम करा, मला फरक पडणार नाही. मात्र, ओबीसी चळवळ बदनाम होता कामा नये,'' असेही लक्ष्मण हाकेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, मी अशा धमक्यांना भीक घालत नाही, मी अशा बदनामीला घाबरत नाही. पण लक्ष्मण हाकेला धमकावणं, ही चळवळ थांबवणं हाच त्यांचा हेतू आहे, असेही हाकेनी म्हटलं.
बीडमधील ओबीसी मेळाव्याला हाकेंना निमंत्रण नाही
राज्यभर ओबीसी प्रश्नावर रान पेटवणाऱ्या लक्ष्मण हाके यांना आज बीडमध्ये होणाऱ्या मेळाव्यातून वगळल्याने राज्यातील ओबीसी नेत्यांना हाकेंचे वावडे वाटू लागले का अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या लक्ष्मण हाके यांना मराठवाड्यातून चांगला प्रतिसाद मिळत होता. यातूनच हाके हे ओबीसीचे ब्रँड नेते बनू लागल्याचे चित्र तयार होत असताना आज बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या महाएल्गार मेळाव्यासाठी हाकेंना निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसी नेत्यातील फूट आता राज्याच्या समोर येऊ लागली असून यापूर्वीही ओबीसी प्रश्नावर अनेक विरोधी वक्तव्य विविध करण्यात आली होती.