Pune News : भारतीय नागरिकांची वागणूक वैज्ञानिक विचारांना अनुसरुन असावी असे भारतीय संविधानात (Indian Constitution) म्हटलं आहे. पण महाराष्ट्रातील आणि भारतातील दिग्गज म्हणवणारे अनेक नेते राजकीय संकट समोर दिसताच कुठल्या न कुठल्या बुवा-बाबाच्या दरबारात हजेरी लावताना दिसतात. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहिल्याची चर्चा सुरु आहे. मात्र बुवा-बाबांच्या दरबारात जाणाऱ्या नेत्यांची यादी बरीच मोठी आहे. 


1. इंदिरा गांधी - योग गुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा इंदिरा गांधींवर प्रभाव होता. राजकीय निर्णय घेण्यातही त्यांचा हस्तक्षेप असायचा असं त्यावेळी बोललं गेलं. धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्यावर विदेशातून अवैध साहित्य आणि शास्त्रे भारतात आणल्याचा आरोप होता आणि त्याबद्दलचा खटलाही त्यांच्यावर चालला. 
- त्याचबरोबर इंदिरा गांधींनी त्याकाळी द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांची घेतलेली भेटही वादग्रस्त ठरली होती.  इंदिरा गांधींनी फिरोझ गांधींशी लग्न केल्याने त्या हिंदू नाहीत आणि त्या विधवा आहेत, असं म्हणत शंकराचार्यानी त्यांना भेटण्यास आधी नकार दिला होता. मात्र लग्नांनंतर देखील त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही असं त्यांनी सांगितल्यावर ती भेट झाली होती. 


2. नरसिंह राव - माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावर तांत्रिक चंद्रास्वामी याचा मोठा प्रभाव होता. राजकीय निर्णय प्रक्रियेत तर तो महत्त्वाची भूमिका बजावायचाच. मात्र चंद्रास्वामीवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप लागले. 1996 मध्ये लंडनमधील एका व्यापाऱ्याला फसवल्याबद्दल त्याला अटकही करण्यात आली होती. 


3. विलासराव देशमुख - माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे सत्य साई बाबा यांचे भक्त तर होते. लातूरमधील जाहीर कार्यक्रमात ते सत्य साई बाबांसोबत सहभागी झाले होते. यावेळी सत्य साईबाबाने चमत्कार करुन हवेतून सोन्याची साखळी काढून दाखवल्याचा व्हिडीओ वादग्रस्त ठरला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला आक्षेप घेतला होता.


4. शिवराज चाकूरकर - माजी गृहमंत्री शिवराज चाकूरकर हे देखील सत्य साई बाबाचे भक्त होते आणि अनेकदा आश्रमांत गुडघे टेकून बसलेले दिसून यायचे. 


5. अशोक चव्हाण - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील सत्य साई बाबांचे भक्त होते आणि मुख्यमंत्री असताना पुण्यातील प्रति शिर्डी या ठिकाणी सत्य साई बाबाच्या पायवार डोकं टेकवून त्यांनी दर्शन घेतलं होतं.

6. गोपीनाथ मुंडे - काँग्रेसच्या या नेत्यांप्रमाणेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे देखील सत्य साई बाबाचे भक्त होते. ते देखील सत्य साई बाबाच्या पायावर डोकं टेकवून पाय पडताना दिसायचे. 


7. देवेंद्र फडणवीस - माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री हे 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना उज्जैनला जाऊन काळे कपडे घालून पूजा करताना आढळून आले होते. 


8. चंद्रकांत पाटील - भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाळगाव इथल्या स्वामी अमृतानंद यांच्या आश्रमात जात असतात. 


9 . उद्धव ठाकरे - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा असला तरी दिवंगत भय्यू महाराज यांच्याशी असलेली त्यांची जवळीक सर्वश्रुत होती. शिवसेनेच्या तिकीट वाटपावर देखील भैय्यु महाराजांचा प्रभाव असायचा. पण भैय्यु महाराज सर्वच पक्षातील नेत्यांच्या जवळचे होते. अनेक नेत्यांच्या मुला-मुलींसोबत त्यांचे जवळचे संबंध होते.