Nilesh Lanke in Sharad Pawar NCP Group : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, सकाळी लंकेंच्या प्रवेशावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं होतं. "निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, अन्यथा त्यांची आमदारकी जाईल", असा दम अजित पवारांनी लंके (Nilesh Lanke) यांना दिला होता. मात्र, अजित पवारांच्या इशाराला न जुमानता निलेश लंके शरद पवारांच्या गोटात दाखल झाले आहेत. आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. पुण्यात पत्रकार परिषदत घेऊन निलेश लंके यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 


निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी?


भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (दि.14) जाहीर केली. या यादीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. सुजय विखे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, विखेंविरोधात तगडा उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. सुजय विखेंविरोधात निलेश लंके  (Nilesh Lanke) यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंकेंच्या  (Nilesh Lanke) मागे लोक उभा राहू शकतात. शिवाय त्यांच्या संपर्काचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे शरद पवार गट निलेश लंकेंना  (Nilesh Lanke) उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. 


निलेश लंकेंच्या प्रवेशाबाबत जोरदार चर्चा 


गेल्या काही आठवड्यांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या गटात जाणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, आमदार लंके यांनी त्यावेळी या बातम्या फेटाळल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत "मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, मात्र राजकारण कधीही पलटू शकतं",असं सूचक विधान निलेश लंके  (Nilesh Lanke) यांनी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा लंके शरद पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. 


भाजपकडून सुजय विखेंना उमेदवारी 


महायुतीकडून अहमदनगरची जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे. तर महाविकास आघाडीकडून नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधून भाजपने सुजय विखेंच्या रुपाने तगडा उमेदवार दिलाय. त्यामुळे शरद पवार गटही तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत होता. निलेश लेंकेंच्या रुपाने शरद पवार गटाला तगडा उमेदवार मिळू शकतो.त्यामुळे अजित पवारांनी सज्जड दम देऊनही निलेश लंके  (Nilesh Lanke) शरद पवार गटात दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nilesh Lanke : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी.... , अजितदादांचा गर्भित इशारा