इंदापूर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय क्षेत्रात घडामोडींना वेग आला आहे. अशातच काही दिवसांपुर्वी माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याची आता शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाने इंदापुरातील राजकीय चित्र पालटलं आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाने आता पक्षातील काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी उघड झाली आहे.
इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात शरद पवारांच्या पक्षातील नेते एकवटल्याचं चित्र इंदापूरात दिसून आलं. प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शाह यांच्या उपस्थितीत आज इंदापुरात परिवर्तन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा नाहीतर महाराष्ट्रातील मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल. असा इशारा दशरथ माने यांनी परिवर्तन मेळाव्यातून इशारा दिला आहे.
परिवर्तन मेळाव्यावेळी बोलताना अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, आज इंदापुरात मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. इंदापूर तालुक्यात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्याच्यांमध्ये धमक असते तोच काम करतो. लोकांसमोर काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे. गेल्या आठ दिवसांमध्ये काय घडामोडी घडल्या, लोकसभा निवडणुकामध्ये कोणी - कोणी प्रामाणिक काम केले ते कळायला हवं. गेल्या 20-25 वर्षे राजकारणात जबाबदार व्यक्ती म्हणून काम करत आहे.
2014 साली अडीच वर्ष अगोदर मला सांगितले, मला लढायला सांगितले. निवडणुकीला अर्ज भरायला 4 दिवस बाकी राहिले तेव्हा अप्पासाहेब मलाच उभं राहायचं सांगितले, आमची समजूत काढली, पवार कुटुंबाचं मी ऐकलं. या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. 2014ची निवडणूक झाली, 2019 मध्ये पण, मी साहेबांकडे चार वेळा चक्करा मारल्या. मात्र,2014, 2019 साली देखील नाही, आता आपलं काही खरं नाही असं वाटतंय असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
अनेकदा माझ्यासारखा भोळा भाबडा कार्यकर्ता बऱ्याचदा बळी पडला आहे. विश्वास दिला, चर्चा झाल्या अनेक लोक साक्षीदार आहेत. यावेळी मदत करा, पुढच्या वेळी मी तुम्हाला मदत करतो असं राजकारण झालं. गेली 25,30 वर्ष या तालुक्यात काम करताना आमचं कुठे चुकलं? आम्ही कुणाचे पैसे घेतले नाहीत. पदरचे पैसे खर्च करतोय. आज आम्ही अपक्ष उभं राहायचा विचार करतोय. मेळाव्यातून लोकांसमोर भूमिका घेऊ असं आमचं ठरलं. उद्याच्या निवडणुकीत आपल्याला काय करायचं हे जनतेनं सांगावे असं असंही यावेळी मेळाव्यात अप्पासाहेब जगदाळे म्हणाले आहेत.
आम्ही सर्वजण बसून हा निर्णय घेऊ
लोकांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवाव्या म्हणून परिवर्तन मेळाव्याचे आयोजन केले आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांना संधी द्यावी पाच वर्षात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची आमची क्षमता आहे.या मेळाव्याची उपस्थिती पाहून कळते की आमचे काम चालते आहे. दहा वर्षे ज्यांना घरी बसवले त्यांनाच पक्षाने उमेदवार जाहीर केली. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. जनतेवर आणि तालुक्यावर अन्याय केलेल्या माणसाला पक्षात घेणे दोन वेळा पराभव झाल्यानंतर असं त्यांनी काय चांगलं काम केलं त्यांना संधी दिली जाते हा जनतेवर लाभलेला उमेदवार आहे. हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही आम्ही सर्वजण बसून हा निर्णय घेऊ स्पष्ट करायला जनतेला वेळ मागितला आहे.
इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही म्हणत शरद पवारांना इशारा
इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. इथलं मोहोळ महाराष्ट्रात उठणार आहे. हा आवाज जनतेचा आहे. आवाज कुणी थांबवू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील. प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. लोक प्रामाणिकपणाला साथ देतात. कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही हे लक्षात घ्या, शरद पवार यांनी आपला इंदापूरमधील निर्णय मागे घ्यावा नाहीतर महाराष्ट्रातील मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल असा इशारा दशरथ माने परिवर्तन मेळाव्यातून दिला आहे.