मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 30) मुंबईत मनसेचा मेळावा (MNS Melava) पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीच्या (Mahayuti) विजयाबाबत शंका उपस्थित केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर देखील राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेला अजित पवारांचा केवळ एक खासदार निवडून आला. त्यानंतर चारच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 आमदार कसे निवडून आले? हा प्रकार संशय निर्माण करणारा असल्याचे त्यांनी म्हटले. आता राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavan) आणि आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी जोरदार पलटवार केलाय. 


सुरज चव्हाण म्हणाले की, राज ठाकरे यांची गजनी चित्रपटातील हिरोसारखी परिस्थिती आहे. माझा त्यांना सल्ला आहे की, भाषणाला येताना त्यांनी आपण 2009, 2014, 2019 आणि आता 2024 साली काय वक्तव्ये केली? ती सोबत आणावी. हे त्यांना पुढील काळात भाषणं करताना उपयोगी पडेल. गजनीसारखे लगेच विसरण्यापेक्षा त्यांच्या लक्षात राहील. राज ठाकरे यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण ते उठ दुपारी आणि घे सुपारीवाले नाहीत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.


ज्या लोकांनी कामं केली नाहीत ते निवडून कसे येतील?


सुरज चव्हाण पुढे म्हणाले की, अजितदादा सकाळी 6 वाजेपासून काम करतात. लोकांमध्ये जाऊन कामे मार्गी लावतात. राज ठाकरेंसारखं दुपारी उठायचं आणि सुपारी घेऊन बोलायचं असं त्यांचं काम नाही. राज ठाकरे यांच्या आमदाराला त्याच्या गावात एक मत पडलं कारण तो एकच व्यक्ती त्या आमदाराने केलेल्या कामाचा लाभार्थी असेल. ज्या लोकांनी कामं केली नाहीत ते निवडून कसे येतील? असा टोला देखील त्यांनी राज ठाकरेंना लगावला.  


बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज ठाकरे यांनी शिकावं


बाळासाहेब थोरात यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. मात्र त्यांच्या खाली काम करणाऱ्या फळीने त्यांचं काम केलं नाही. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज ठाकरे यांनी शिकावं. कारण ते टीकाटिप्पणी करून वेळ घालवण्यापेक्षा कामाला लागले आहेत, असेही सुरज चव्हाण यांनी म्हटले. 


जनतेचा राज ठाकरेंवर भरवसा राहिलेला नाही


तर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे म्हणाले की, राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी राहिली आहे. मनसेची भूमिका कायमच गोंधळलेली आहे. आम्हाला लोकसभेला फारसं यश मिळालं नाही पण आम्ही विधानसभेला लोकांमध्ये गेलो. ऋतूप्रमाणे आपल्या भूमिका बदलणारी मनसे आहे. त्यांचा पक्ष आणि चिन्ह राहिल की नाही याची चिंता त्यांनी करावी. 128 जागा लढवून 1.55 टक्के मतं मिळाली. त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रातील जनतेला मनसे आणि राज ठाकरेंवर कसलाही भरवसा राहिलेला नाही. विधानसभेत त्यांचा एकही प्रतिनिधी नाही. आपल्या उमेदवारांना तिथल्या निकालांवर विश्वास नव्हता तर तुम्ही आजवर गप्प का? तीन महिन्यांनंतरही संशय व्यक्त केला तर याला फारसा अर्थ उरत नाही.  राज ठाकरे यांची देखील ईडीची चौकशी लागली होती, त्यामुळेच तर त्यांची भुमिका बदलली नाही ना? लोकशाहीत निवडणूक लढल्याशिवाय आपल्या पक्षाची ताकद कळत नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी राज ठाकरेंना दिले. 


आणखी वाचा 


Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं, विधानसभा निकालाची पिसं काढली!