मुंबई : राज्यात गुटखा (Gutkha) बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षांत गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांनी दिली. दरम्यान, राज्यात गुटखा बंदी असतानाही पोलिसांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे, सरकार आता गुटखा विक्री करणाऱ्यांवर थेट मोक्काची कारवाई करणार आहे.   

Continues below advertisement

गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार “हार्म आणि हर्ट” या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानुसार नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच अन्न व औषध प्रशासन विभाग कामाला लागले आहे. गुटखा उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणणार आहे, कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचेही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

गुटखाबंदी कायदा कठोर करण्यासाठी व मकोका लावण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल करून सुधारित प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे लवकरात लवकर पाठविण्याचे निर्देश नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे, आता राज्यातील अवैध गुटखा व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून गुटखा विक्रीवर निश्चित त्याचा परिणाम दिसून येईल. 

Continues below advertisement

यवतमाळमध्ये 20 लाखांचा गुटखा जप्त

दरम्यान, 4 दिवसांपूर्वीच यवतमाळमध्ये अवैध गुटख्याची मोठी कारवाई करण्यात आली होती, अदिलाबाद येथून खरेदी केलेला सुगंधीत पान मसाला गुटखा यवतमाळमार्गे अमरावती जात असतांना एलसीबी पथकाने जप्त केला. ही कारवाई शहरालगतच्या घाटंजी टी पाईंट परिसरातील नागपूर मार्गावर करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांना अटक करीत दोन वाहनांसह 19 लाख 53 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घाटंजी टी पाईंट परिसरातील नागपूर मार्गावर सापळा रचला. यावेळी एका पाठोपाठ एक येणारी एमएच-27-बीएक्स-9444 क्रमांकाची बोलेरो पीक अप वाहन आणि चारचाकी क्रमांक एमएच-04-एचएन-4589 अशी दोन संशयीत वाहने थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी एका वाहनात भाजी पाल्याचे रिकामे प्लास्टीक कॅरेट आणि दुसऱ्या वाहनात सुगंधीत पान मसाला तंबाखुजन्य गुटखा  किंमत सात लाख 12 हजार 700 रूपये आढळून आला. या प्रकरणी एलसीबी पथकाने सुगंधीत पान मसाला तंबाखुजन्य गुटखा आणि दोन वाहने असा एकूण 19 लाख 53 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

हेही वाचा

अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी