Beed Muk Morcha बीड : समाजाला घेऊन जाणारा आमचा संतोष देशमुख आज आमच्यामधून निघून गेला आहे. मात्र ज्यांच्यामुळे हे कृत्य घडलं आहे तो वाल्मीक कराड याला घोडा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मनसुख हिरेन प्रकरण शोधून काढलं. मग आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या घटनेकडे कुणाच्या दबावाखाली काम करत आहात? हे उत्तर तुम्ही देणं गरजेचं असल्याची टीका आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केली आहे. 


अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना हाकलून लावले पाहिजे- नरेंद्र पाटील


धनंजय मुंडे यांना जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाच्या पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना हाकलून लावले पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. माणुसकी म्हणून ज्या अजित पवारांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली त्याच अजित पवारांनी मंत्रिमंडळात मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देणे गरजेचं नव्हतं, मात्र ते झालं. संतोष देशमुख हा केवळ मराठा नसून बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीचा आहे. एवढंचं मला आज आवर्जून सांगायचं आहे. बीडमध्ये कुण्या एका जातीची हत्या झाली नसून ती संबंध माणुसकीची हत्या झाली आहे. माझी आज सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन आहे की या प्रकरणातील न्याय मिळेपर्यंत आपण शांत राहायचं नाही. या प्रकरणातला मुख्य आका कोण आहे हे आता शोधून काढल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला आहे.


बीडमध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर लोटला


बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आज 19 दिवस पुर्ण झाले आहेत. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे, या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत, त्याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमध्ये मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे, हजारो लोक हातामध्ये छोटे-छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत आहे, हजारो लोक मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे. सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांच्यासह बीड जिल्हा रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. 


कोपर्डी प्रकरणाप्रमाणेच देशमुख हत्येविरोधात राज्यभरात मोर्चे निघतील : अभिमन्यू पवार 


कोपर्डीचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले, संतोष देशमुख हत्येविरोधात देखील राज्यभरात मोर्चे निघतील, अशी प्रतिक्रिया अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.