Nagpur News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात सराईत गुंड युवराज माथनकरने (Yuvraj Mathankar) ही शिवसेनेत प्रवेश घेतला, हे आम्हाला माध्यमांमध्ये बातमी पाहूनच कळलं, असं अफलातून स्पष्टीकरण शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांनी दिलं आहे. आमच्या पक्षात प्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत युवराज माथनकर यांचं नाव नव्हतं. शिवाय युवराज माथनकर नामक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती नव्हती, असेही सुरज गोजे यांनी यावेळी सांगीतलं  

दरम्यान, शनिवारी पक्ष प्रवेश होताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. याच गर्दीत युवराज माथनकर तिथे आला असावा आणि त्याच्या गळ्यात दुपट्टा टाकण्यात आला असावा, माथनकर याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. असे म्हणत सुरज गोजे यांनी सराईत गुंडाच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय.

....पण पक्ष प्रवेशाशी युवराज माथनकरचा काहीही संबंध नाही- सुरज गोजे

दरम्यान, युवराज माथनकर मंचावर एकनाथ शिंदे यांच्या जवळ दिसत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असून नगर विकास मंत्री असल्याने अनेक लोक काम घेऊन येतात, त्याच कारणाने युवराज माथनकर ही आला असावा, अशी अजब शंका शिवसेनेने व्यक्त केली आहे. युवराज माथनकर कार्यक्रम स्थळी दिसत आहे. हे आम्ही नाकारत नाही, पण पक्ष प्रवेशाशी त्याचा काहीही संबंध नाही, असेही आता शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

माथनकर विरोधात हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद

नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकर ने शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतलाय. युवराज माथनकर विरोधात लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. त्यामुळे त्याचे काही वर्ष तुरुंगातही गेले असून अनेक प्रकरणातून त्याची निर्दोष सुटका झाल्याची माहिती आहे. मात्र, नागपुरात आज ही लोकं त्याला एक सराईत गुंड म्हणून ओळखतात आणि त्याच युवराज माथनकरला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. 

वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही, याची काळजी स्थानिक नेतृत्वाची- एकनाथ शिंदे

नागपुरात शनिवारी 29 जूनला  एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा पार पडला. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी प्रवेश घेणाऱ्याच्या गर्दीत युवराज माथनकर ही होता. प्रवेश घेतल्यानंतर तो त्या ठिकाणी जास्त वेळ थांबला नाही आणि लगेच निघूनही गेला. कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता स्थानिक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी करतात. त्यामुळे कोणी वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही, याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यायची असते, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. 

हे ही वाचा