मुंबई : राज्यातील पुढील काही महिन्यात निवडणुकांचे (Election) पडघड वाजू लागणार आहेत. पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून दुसरीकडे मुंबईत आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धडपड पाहायला मिळत आहे. त्यातच, एका मुलाखतीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मराठी आणि महाराष्ट्रापुढे आमचा वाद किरकोळ असल्याचे म्हणत ठाकरे बंधुंच्या युतीचे संकेत दिले होते. त्यावरुन, गेल्या 2 महिन्यांपासून ठाकरे बंधु एकत्र येणार, महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहेत. तर, शिवसेना (Shivsena) पक्षाच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) युतीसाठी अनुकूल असून लवकरच युती होईल, असे स्पष्ट संकेत दिल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
शिवसेना-मनसेच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत असून त्यावरुन टीका टिपण्णीही सुरू आहे. मात्र, शिवसेना पक्षातील फुटीनंतर बदललेलं राजकारण आणि मनसेची सध्याची ताकद लक्षात घेता ह्या युतीचा किती फायदा दोन्ही पक्षांना होईल, याचेही विश्लेषण केले जात आहे. त्यामुळेच, मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिके शिवसेना आणि मनसेची ताकद किती, या अनुषंगानेही राजकीय वर्तुळात चर्चा घडत आहे. या दोन्ही पक्षाचे सध्याचे महापालिकांमधील बलाबल ह्याच पाहुया.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिका 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण 99 नगरसेवक होते. मात्र, शिवसेना पक्षातील फुटीनंतर सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 54 नगरसेवक आहेत. गत 2017 च्या निवडणुकीत मनसे पक्षाचे 7 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यातील एक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत आणि सहा नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याने सद्यस्थितीत मनसेकडे एकही नगरसेवक नाही.
कल्याण डोंबिवली महापालिका
शिवसेनेचे 57 नगरसेवक निवडून आले होते, शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 9 नगरसेवक आहेत. तर मनसे पक्षाचे निवडून आलेले 9 आणि एक अपक्ष मिळून 10 नगरसेवक आहेत.
ठाणे महापालिका
महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त तीन नगरसेवक आहेत. तर मनसे पक्षाचा एकही नगरसेवक सद्यस्थितीत ठाणे महापालिकेत नाही.
नवी मुंबई महापालिका महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 38 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे 4 नगरसेवक आहेत, तर मनसेकडे एकही नगरसेवक नाही.
महत्त्वकांक्षा -
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि केडीएमसी या चारही महापालिका निवडणुकांमध्ये सद्यस्थितीत शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला डॅमेज कंट्रोल सोबत संघटना आणखी मजबूत करून पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे. त्यामुळे, मुंबईसह उपनगरातील प्रमुख महापालिकांवर पुन्हा सत्ता आणायची असल्यास तर मराठी मतदार एकत्र करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत मनसेकडे नगरसेवकांचा आकडा जरी बोटावर मोजण्याइतका असेल तरी पक्षाला उभारी देण्यासाठी आणि आपला मतदार आपल्यासोबत टिकून या महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी समविचारी पक्षाला सोबत घेण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे, ठाकरे बंधु एकत्र आल्यासा निवडणूक निकालात वेगळं चित्र पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
एकत्र येण्यास अडचणी
सध्याच्या घडीला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या फक्त चर्चा सुरू आहेत. प्रत्यक्षात कुठलाही प्रस्ताव एकमेकांसमोर कुणीही ठेवलेला नाही. त्यामुळे युती होणार की नाही हा संभ्रम अजूनही कायम आहे. युती झालीच तर जिथेजिथे मराठी मतदार मोठ्या संख्येने आहे, तिथे तिथे दोन्ही पक्षांची ताकद जवळपास सारखीच असल्याने जागा वाटपात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मराठी मतदार आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत असताना जागा वाटपात तडजोड न झाल्यास युतीसाठी अडचण निर्माण होऊ शकते.