Sanjay Raut : अशोक चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला रामराम ठोकत कमळ हातात घेतलं. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राम लहर संपली! आता रामनाम सत्य है! या रोखठोख सदरात संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. त्याशिवाय अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. भाजपमध्ये जाण्याआधी दोन दिवस आधी अशोक चव्हाण आमच्यासोबत जागावाटपाच्या चर्चा करत होते, आम्हाला ते अगदी हिरिरीने सांगत होते. मात्र त्यांनी राजकीय व्याभिचार केला, अशी खरमरीत टीका संजय राऊतांनी केली आहे. या सदरात त्यांनी भाजपाचा राजकीय कुंटणखाना आता बंद होणार असल्याचं म्हटलं आहे.
ईडीला घाबरुन अशोक चव्हाण भाजपात गेले -
एकेकाळी महाराष्ट्र पुरोगामी विचार व विचारांवरील निष्ठेसाठी ओळखला जात असे. आज महाराष्ट्र बेईमानी, राजकीय बेडुकउड्या व घसरलेल्या राजकीय संस्कृतीसाठी ओळखला जात असेल तर या घसरणीस फक्त भाजपा जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गुळण्या टाकण्याचे काम भाजप करते आहे. ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे व ज्यांचे संपूर्ण कुटुंब काँग्रेसच्या विचारांवर पोसले गेले ते अशोक चव्हाणही काँग्रेस सोडून भाजपावासी झाले. काँग्रेसच्या राजकारणातला सुसंस्कृत चेहरा म्हणून ते ओळखले गेले, पण ईडी कारवाईच्या भयाना त्यांना काँग्रेस सोडून भाजपात जावं लागलं, असे संजय राऊत म्हणाले.
तेव्हा भाजपनं बोंब मारली, आता...
मुंबईतल्या कफ परेड भागात असलेल्या भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने 32 माळ्यांचा एक आलिशान टॉवर उभा राहिला. ज्याची मूळ संमती पाच माळ्यांची होती. पण त्यावर भ्रष्टाचाराचा एक, एक माळा चढवत गेले. राजकारणी, प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी त्या इमारतीत फ्लॅट्स घेतले. अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाचे चार ते पाच फ्लॅट्स इमारतीत होते. कारगीलच्या शहिदांच्या कुटुंबांसाठी राखीव असलेली ही आदर्श इमारत म्हणजे भ्रष्टाचार आण शहिदांचा अपमान असल्याची बोंब तेव्हा भाजपाने मारली. या प्रकरणात अनेकांना तुरुंगात जावे लागले. देवेंद्र फडणवीस आदर्श भ्रष्टाचारावर तापलेल्या तव्यावरील वाटण्यासारखे ताडताड करताना महाराष्ट्राने पाहिले. मात्र आता हा वाटाणा शांत झाला. अमित शाह, नरेंद्र मोदी यांनीही या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनीच अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश करुन घेतला. इतका खोटारडेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजवण्यात भाजपाने गेल्या काही काळात घेतलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहेत, असे संजय राऊतांनी आपल्या सदरात म्हटलेय.
भाजपाची उरलीसुरली इज्जतही मातीमोल झाली
अशोक चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय व्याभिचाराची कल्पना कुणालाच येऊ दिली नाही. अशोक चव्हाणांना फोडल्याने काँग्रेसचे किती नुकसान झाले ते सांगता येणं कठीण आहे, पण भाजपाची उरलीसुरली इज्जतही मातीमोल झाली. अशोक चव्हाण लीडर नसून डीलर आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनीच केली होती. त्याच्या डीलरशी फडणवीसांना डील करावं लागलं. चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने भाजपाला अनैतिकतेचे सूतक लागले व ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. मुंबईतील भाजपाचे नेते आशिष शेलार यांना पत्रकारांनी चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते प्रश्नकर्त्यावरच भडकले. मी तुम्हाला उत्तर देणार नाही असं सांगून पळून गेले. महाराष्ट्रातील भाजपाचा राजकीय कुंटणखाना बंद होण्याची सुरुवात आहे, असे राऊत म्हणालेत.