MNS Mira Bhayander Morcha: मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीने मोर्चाची (MNS Mira Bhayander Morcha) हाक दिली होती. त्यानंतर या मोर्चाला मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) पाठिंबा दिला. आज (8 जुलै) सकाळी बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा जारी केल्या. तसेच आज रात्री पहाटे रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतला. सकाळी 9 वाजल्यापासून पोलिसांनी मोर्चाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेतलं. यावेळी मनसेसह मराठी लोक मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि वाद चांगलाच चिघळला. पोलीसांनी पोलीसी बाळाचा वापर करत शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तीन ते चार बस भरून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र आंदोलक तरीही ऐकण्यास तयार नव्हते. मनसेसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील मोर्चात सहभागी झाले आणि मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
...अन् ठरलेल्या मार्गानेच मोर्चा निघाला-
3 ते 3.30 तासांच्या राड्यानंतर मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानेच निघाला. बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले आहेत. मनसेचे नेते अभिजित पानसेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा आता शांतीनगर भागाच्या आसपास दाखल झाला आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर जैन आणि गुजराती लोकसंख्येचे प्रमाण जास्त झाला आहे. त्यामुळे शांतीनगरच्या वेशीवर स्वामी विवेकानंद रोडवर पोलिसांनी मोर्चा पुन्हा रोखला आहे. त्यामुळे मराठी आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आम्हाला पुढे सोडणार नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या मांडू, अशी भूमिका मराठी आंदोलकांनी घेतली आहे. मिरा रोड स्टेशन जवळील शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मारकाजवळ मोर्चा समाप्त झाला. परंतु मनसे नेते अविनाश जाधव यांना जोपर्यंत पोलीस सोडत नाही तोपर्यंत मोर्चा असाच चालू राहणार, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर अविनाश जाधव यांना पोलिसांकडून सोडण्यात आले.
मराठीचा माज काय असतो, हे दाखवून दिले- अविनाश जाधव
अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाने दाखवलेल्या एकीबद्दल आनंद व्यक्त केला. मला ताब्यात घेण्यापेक्षा आजचा मोर्चा होणे महत्त्वाचे होते. आम्ही नसतानाही लोकं तिकडे रस्त्यावर उतरली होती. त्यांनी मराठीचा माज काय असतो, हे दाखवून दिले. ज्या लोकांनी या सगळ्या गोष्ट केल्या आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही. परंतु, मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की, आज मराठी माणूस एकजूट झाला. मला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मीरा भाईंदर, वसई आणि विरारमधील मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली नसती आणि आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चाला असते तर हा मोर्चा प्रचंड झाला असता. हा मोर्चा होणे खूप गरजेचे होते. महाराष्ट्राच्याविरोधात 100 -200 लोक मोर्चा काढत असतील तर त्याला पाच-पंचवीस हजारांच्याच गर्दीनेच उत्तर देणे गरजेचे होते. यापुढे कोणीही अशाप्रकारे महाराष्ट्र आणि मराठीविरोधात मोर्चा काढायची हिंमत करणार नाही, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
मीरा-भाईंदर नेमकं का तापलं?
मुंबईसह महाराष्ट्रात मराठीचा (Marathi) मुद्दा तापला असताना मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी 29 जूनच्या रात्री मराठी भाषा न बोलल्याच्या कारणावरून जोधपूर स्वीट्स अँड फरसाणचे मालक बाबूलाल चौधरी यांना मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून मारहाण केली होती. बाबूलाल यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नेमकं काय घडलं होतं?
जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेले होते. तेव्हादेखील या दुकान मालकाचा मराठी न बोलण्याचा हेका कायम होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकान मालकाच्या कानाखाली जाळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर मीरा-भाईंदरमधील अमराठी व्यापारांनी मोर्चा काढला होता.
3 जुलै व्यापारांनी दुकानं बंद ठेवून काढला होता मोर्चा-
मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. याविरोधात 3 जुलै रोजी मीरा-भाईंदरच्या काही भागात व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता. व्यापाऱ्यांच्या या मोर्चाला भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांची फूस असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला होता.
मोर्चावरुन देवेंद्र फडणवीस काय बोलले?
पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मिरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनसे आणि पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार त्या रुटबाबत चर्चा सुरु होती. मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल, असा रुट मागत होते. पण पोलीस त्यांना नेहमीचा रुट घ्या, असे सांगत होते. मात्र, मनसेने त्याला नकार देत आम्ही आमच्याच मार्गाने जाणार अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मंत्री प्रताप सरनाईक पोलिसांच्या भूमिकेवर संतापले-
पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत, असंही प्रताप सरनाईकांनी सांगितले. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे आहे. मीरा रोडमध्ये जे सुरुय ते अत्यंत चुकीचं आहे, असं थेट प्रताप सरनाईकांनी सांगितले. तसेच मी देखील मोर्चामध्ये सहभागी होण्यास निघालोय, हिंमत असेल तर मला अडवा, असं आव्हान प्रताप सरनाईकांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना विचारला जाब-
मीरा भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तसेच मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का?, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देवेंद्र फडणवीसांना दिले आहेत. दरम्यान, मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे काय म्हणाले?
मीरा भाईंदरमध्ये आम्ही सर्व ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमला आहे. महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानकं आणि जंक्शनच्या परिसरात बंदोबस्त नेमण्यात आला आहे. काल आम्ही शहरात रुट मार्च काढला होता. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार दक्ष आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो की, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. कोणीही मोर्चाचं ठिकाण जे सांगितलं होतं, तिकडे कोणीही येऊ नका. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. ज्या व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने बेकायदेशीर कृत्य करतील, असा संशय आणि वाजवी कारण होतं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कायदा सुव्यवस्था राखणयासाठी पोलीस दलाला सर्वांनी सहकार्य करावे. ज्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, तिकडे नागरिकांना जमण्याचे आवाहन करणे, हे बेकायदेशीर कृत्य आहे. अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे यांनी म्हणाले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कोणती भूमिका घेतली?
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, ज्या ठिकाणी परवानगी मागितली आहे, त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितले आहे की, तुम्ही जागा बदल्यास सांगितली. तुम्हाला आम्ही मोर्चाची परवानगी देऊ. मात्र, ते मोर्चाची जागा बदलण्यास तयार नाहीत. कोर्टाच्या काही गाईडलाईन्स देखील आहेत. त्या गाईडलाईन्सचे आम्हाला पालन करायचे आहे. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे ही आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक आमदार नरेंद्र मेहता काय म्हणाले?
मोर्चा काढणं चुकीचं नाही.पोलिसांकडे गोपनीय विभाग देखील असतो. पडद्यामागे काय वेगळं सुरु असेल त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिली नसेल असं वाटतं. परप्रांतीय मोर्चाला परवानगी दिली नव्हती. मोर्चे आम्ही पण काढत असतो मात्र हेतू चुकीचा असेल, कायदा आणि सुव्यवस्थासाठी राखण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नसेल. यातच काही उलटसुलट घडलं तर तुम्हीच पोलिसांना जबाबदार धराल. चांगल्या गोष्टींसाठी आमचा पाठिंबा असणारच. आम्ही अनेकदा मराठी माणसाच्या पाठीमागे उभे राहिलो आहोत, असं भाजपचे आमदार नरेंद्र मेहता म्हणाले.
विरोधकही आक्रमक, वरुण सरदेसाई काय म्हणाले?
जर गृह खात्याने कार्यकर्त्यांना अटक करा, हे आदेश दिले नव्हते. तर मग मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्वतःच पोलिसांना सांगून स्वतःची अटक करून घेतली का?, प्रताप सरनाईक मंत्री आहेत, तरी देखील त्यांच्या मतदार संघात काय सुरू आहे हे माहिती नाही का?, तुम्ही व्यापाऱ्यांना मोर्चा काढून दिला त्यांच्या परवानगीचे पत्र आम्हाला दाखवणार आहात का?, असे विविध सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केले.
संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर कडाडले-
मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे. कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले पाहिजे. मीरा भाईंदर मध्ये सर्वपक्षीय त्यांचे झेंडे बाजूला ठेवून एक प्रतिकात्मक मोर्चा काढत आहेत आणि या मोर्चाची परवानगी मागितली जाते. पहाटे मनसेचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी अविनाश जाधव, राजू पाटील शिवसेनेचे काही प्रमुख नेते आहेत. आमचे पदाधिकारी आहेत इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत. त्या सगळ्यांना नोटीस बजावण्यात आली मोर्चा काढू नका आणि मग त्यांना अटक केली. तुमच्यावर कोणत्या दुबेंचा दबाव आहे हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.