मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या विरोधात मनसे (MNS) चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्याचे बोलेले जात आहे. दरम्यान, अमोल मिटकरींनी नुकतेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर  टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मनसेसैनिकांनी ही गाडी फोडली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनसेनेते संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) दिली आहे. एकुणात मनसेने या कृत्याचे समर्थनच केलं आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली असेल तर त्यात गैर काहीही नाही. यासाठी मनसेसैनिकांचे अभिनंदनच आहे. कारण कुणाच्या तोंडात जे येईल ते जर कुणी बरळत असेल तर त्याला उत्तर दिलेच पाहिजे.असेही मनसेनेते संदीप देशपांडे म्हणाले. कुणा बद्दल आपण बोलतो आहे, बोलताना आदर ठेवलाच पाहजे. मात्र बोलताना तुम्ही चुकीच्या शब्दात भाष्य करत असाल तर त्याचे परिणाम भोगावेच लागेल, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला आहे. 


नेमका वाद काय?


राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना लक्ष्य केले होते. पुण्यातील मुसळधार पावसाचा विषय निघाला तेव्हा राज ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली होती. अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली, असे राज ठाकरे यांनी भेटले होते. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर तिखट भाषेत टीका केली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा केला होता. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये.  हे सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही.


राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.


इतर महत्वाच्या बातम्या