छत्रपती संभाजीनगर: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची प्राथमिक इच्छा बोलून दाखवल्यानंतर मनसे(MNS) आणि भाजपमध्ये वितुष्ट निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात जोरदार चर्चा रंगल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे खास मित्र असलेले भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या अनेक वर्षांच्या मैत्रीला तिलांजली दिल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संभाव्य युतीविषयी प्रश्न विचारताच आशिष शेलार यांनी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता 'माझ्यादृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला', असे म्हटले होते. याच मुद्द्यावरुन मनसेचे फायरब्रँड नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी आशिष शेलारांना खोचक टोला लगावला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

आमचा सगळा पक्ष ,पक्षाचे नेते ,राज ठाकरे यांचा परिवार , कालपासून आम्ही धक्क्यात आहोत. आम्हाला अतीव दुःख झालंय. काहींनी अन्न पाणी सोडले . या दुःखातून आम्ही कशा बाहेर पडावं याची चिंता आहे. कारण आशिष शेलार यांनी मैत्री तोडली, अशी खोचक टिप्पणी प्रकाश महाजन यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या आधी तोडले असती तर बरं झालं असतं. त्यांच्या लक्षात आलं असतं, मैत्रीच्या जगातला राज ठाकरे हे राजे आहेत. यापूर्वी शेलारांचे विरोधात कधीही राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे ईश्वराला प्रार्थना करतो की, या धक्क्यातून आम्हाला सावरण्याची शक्ती द्यावी .आशिष शेलारला हे कळायला पाहिजे होतं राज ठाकरे अशी  व्यक्ती आहे की, राज साहेब यांच्या डोक्याला बंदूक लावून कोणी काहीही मान्य करून घेऊ शकत नाही .आताच आशिष शेलारला असं का वाटलं? आशिष शेलार यांची किंमत भाजपामध्ये आहे, कारण ते राज ठाकरे यांचे मित्र आहेत म्हणून. हे विसरू नका.व्यक्तिगत संबंध तोडायची कारण दिली असती तर त्यावर चर्चा झाली असती. विनाशकाले विपरीत बुद्धी. राज ठाकरे सारखा मित्र गमावणे हे बौद्धिक दिवाळखरीचे लक्षण आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना सूचना

राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत या विषयावर कोणीही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी दिली. 

आणखी वाचा

माझ्यादृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला, आशिष शेलारांचे वक्तव्य; राज ठाकरेंसोबत मैत्रीत दुरावा?