बीड : आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित भाषणात आमदार सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी केली. बीड जिल्ह्याच राजकारण,समाजकारण, इतिहास, राजकीय वारसा आणि सध्याची परिस्थीती यावरही जोरदार भाषण केलं. गोपीनाथ मुंडेंएवढा (Gopinath munde) पहाडासारखा माणूस याच जिल्ह्याने महाराष्ट्राला दिल्याचेही सुरेश धस यांनी म्हटले. तसेच, शिरुर आणि पाटोदा तालुक्यासाठी आणखी 3.7 टीएमसी पाणी देण्याची मागणी केली. देवेंद्र बाहुबली हेच आमचं काम करु शकतात, तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे, असे म्हणत ही योजना मंजूर झाल्यास मी जिवंत राहिल किंवा नाही, पण या मतदारसंघातून भाजपचाच आमदार राहिल, असेही आमदार धस यांनी म्हटले.
आपण सभागृहात सांगितले सुरेश धस तुम्हाला 300 कोटी रुपये दिले महणाले आणि तुम्ही लगेच देवून पण टाकले. आम्हाला दुसऱ्या कोणाकडूच अपेक्षा नाही. कारण, फक्त देवेंद्र बाहुबलीच आम्हाला ते देऊ शकतात. तुम्ही प्रशांत बंब यांची योजना एका झटक्यात केली. मी तुमचा लाडका आहे, मला 3.57 टीएमसी पाणी शिरुर आणि पाटोदा तालुक्याला द्या. जायकवाडीमधून ते पाणी द्या. मज पामराने तुमच्यापुढे काय मांडावे, तुम्हाला पाण्याबाबत, सिंचनाबाबत सगळं माहितीय. माझी ती योजना झाली तर, पाटोदा तालुका आणि शिरुर तालुका. मी जिवंत राहिल किंवा नाही, पण या मतदारसंघात परत भाजपचाच आमदार राहिल हेही तुम्हाला सांगतो, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भरभरुन कौतुक केले.
सध्या बीड जिल्ह्याची बदनामी होतेय असं काहीजण म्हणतात. या जिल्ह्याने क्रांती सिंह नाना पाटील निवडून दिले, बबनराव ढाकणे दिले, प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचाचा माणूस दिला. गोपीनाथराव मुंडे एवढा पहाडासारखा माणूस दिला, आज ज्या जमिनीवर ह्या कामाचा शुभारंभ होतोय, प्रकल्प उभारतोय ती जमीन रक्षा विभागा कडे जाणार होती, पण जॉर्ज फर्नाडीस हे रक्षामंत्री होते, मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली असे म्हणत गोपीनाथ मुंडेंचं योगदान देखील सांगितलं.
संतोष देशमुख प्रकरणी कणखर भूमिका
बीड जिल्ह्यात ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासली, पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली, तु्म्ही म्हणाले, कुणालाच सोडणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. माझं भाग्य आहे, परमभाग्य आहे 1999 ते 2004 या कालावधील साहेबांच्यासोबत बसण्याची संधी मला मिळाली, त्यांच्या मागे-पुढे मी असायचो. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर राजकीय कटकारस्थान करुन त्रास देण्याचा प्रयत्न झाला. पण, आपण माझ्या पाठीमागे दत्त बनून उभे राहिलात, असेही धस यांनी म्हटले.
हेही वाचा
पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ