Dattatray Bharne Viral Video : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ समोर आला आहे. इंदापूरमधील (Indapur) हा व्हिडीओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे यात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. तो बारामती अॅग्रोचा (Baramati Agro) कुणीही येणार नसल्याचं दत्ता भरणे म्हणत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत असून बारामती लोकसभा मतदारसंघात ते सुनेत्रा पवांरासाठी प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. दत्तात्रय भरणेंचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही : रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलंय की, "केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही."
भरणेंचा व्हिडीओ शॉकींग, मला आश्चर्य वाटतंय : सुप्रिया सुळे
दत्तात्रय भरणेंच्या व्हायरल व्हिडीओबाबत सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ शॉकींग आहे. मला आश्चर्य वाटतंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
व्हिडीओ शूट करणाऱ्या बारामती अॅग्रोच्या माणसाला त्या मतदान केंद्रावर कुणी पाठवलं? : अमोल मिटकरी
दत्तात्रय भरणेंच्या व्हिडीओबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. इंदापूरमधील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून दत्तारामांनी भरणे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या बारामती अॅग्रोच्या माणसाला त्या मतदान केंद्रावर कुणी पाठवलं? याची चौकशी करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.