पुणे: राज्यात उभे राहिलेले मराठा आरक्षण आंदोलन जिरवायचे नसेल तर मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असे भांडण लावण्यात आले आहे. वंचितची (VBA) भूमिका आहे की, मराठा आणि ओबीसी समाजाचं आरक्षणाचं ताट वेगवेगळं असेल. मराठ्यांचे ताट वेगळे व्हावे, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) लढत आहेत. पण त्यांना माझा प्रेमाचा सल्ला आहे की, मराठा आरक्षण आंदोलन जिरवायचे नसेल तर त्यांना निवडणुकीत लढण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.


सध्या मुस्लिम समाज सुद्धा स्वतःची सुरक्षा राजकीय पक्षात शोधत आहे. मुस्लिम समाजाला सांगतोय की, राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाही. वंचितसोबत मुस्लिम समाजाला सुरक्षितता मिळेल. राज्यात ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण 48 पैकी 48 जागा जिंकू.  जिथे जिथे वंचितचा उमेदवार उभा राहील, तिथे मुस्लीम समाजाने त्याला निवडून द्यावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. 


महाविकास आघाडीशी युती होईल का सांगता येत नाही: प्रकाश आंबेडकर


लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. देशात पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार येणार नाही, याची दक्षता घ्या. निवडणुकीच्या काळात देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न होईल. नेत्यांची पळवापळवी होईल. पण मतदार ठरवेल की, उद्या सत्तेवर कोण बसणार? उद्या महाविकास आघाडीसोबत युती होईल की सांगता येत नाही. पण युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. काही झालं तरी आपलं गणित पक्कं करुन घ्यायचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 


फुले, शाहू, आंबेडकर विचाराच्या प्रत्येक मतदाराने  ५ मतदार जोडले पाहिजेत. ज्या दिवशी हे पाचजण एकत्र येतील तेव्हा भाजप केंद्रात येणार नाही. ही पक्षाची नाही तर आपली स्वतःची निवडणूक असणार आहे. तुम्हाला वेगळी वेगळी करणे देऊन सुद्धा बंदिस्त केलं जाईल. बंदिस्त राहायचं आहे का, याचा निर्णय लोकसभेत घ्यायचा आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.



आमच्याशी दगाफटका केलात तर... सुजात आंबेडकरांचा महाविकास आघाडीला इशारा


आगामी लोकसभा निवडणूका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे. चर्चा अशीही सुरू आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेते की नाही?, वंचित नेहमीच भाजप विरोधात, मोदींविरोधात लढली आहे. त्यांना पुरून उरली. महाविकास आघाडीला एक सांगतो. तुम्ही तुमचा खोडसाळपणा केला तर तुम्हाला जनता माफ नाही करणार. युती करून महाविकास आघाडीने कटकारस्थान रचणे, खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा तुम्हाला आंबेडकरी जनता माफ नाही करणार, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला.


आणखी वाचा


मनोज जरांगे पाटील यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा