Manoj Jarange Patil And Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सण साजरा होतो. अशात, गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होताना दिसू शकेल. त्यातच मनोज जरांगे आंदोलनसाठी मुंबईत दाखल झाल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. याचदरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईतील मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतरही मनोज जरांगे मुंबईतील मोर्चावर ठाम आहेत. मोर्चा काढणारचं असा मोठा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर देखील मनोज जरांगे मुंबईतील मोर्चावर ठाम आहेत. अजून बोललोच नाही. तुमच्या समोरच चर्चा करणार, असं मनोज जरांगेंनी सांगितले. एक रस्ता आम्हाला द्या..कोणताही द्या...हजार रस्ते आहेत. एक द्या..मी मोर्चावर ठाम..अंमलबजावणी पाहिजे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. माझ्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चर्चा नाही, अंमलबजावणी करा..., असं मनोज जरांगे म्हणाले. तीन महिन्यांचा वेळ द्या म्हणाले होते. परंतु उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत निघणार, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांचे विशेष कार्यकारी अधिकारी काय म्हणाले?
उद्या राज्यभरात गणपतीचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील 10 दिवस हे गणेशोत्सवाच्या धामधुमीचे असतील. या काळात मराठा मोर्चा मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी स्वत:हून पुढे टाकले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. मी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो. त्यांची यासंदर्भात काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो, असे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी सांगितले.
ओएसडींच्या भेटीनंतर मनोज जरांगे काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आणि कुणबी एक आहेत, याचे सरकारी दस्ताऐवज सापडले आहेत. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा आरक्षणासाठी रोडमॅप वगैरे कशाला हवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरुन टाकतो. त्यांनी कधी इतकी फुलं बघितली नसतील, वास मारणारी, बिगरवासाची सगळी फुलं आणतो. फडणवीस साहेबांचा बंगला नाय गुलाबाच्या पाकळ्यांनी भरुन काढला तर नाव बदलेन माझं. उगाच गोरगरीबांच्या लेकरांची का नाराजी घेता? मला जेलला टीका, मी सडायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्हाला आरक्षण देतो, तुमच्या अंगावरचं कातडं काढून द्या, तरीही मी तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)
- अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार...
- अंतरवाली - पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)
- 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर...28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.
- 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार...