Beed: दसऱ्यादिवशी मेळावा घेण्याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. त्यात शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा असो की भगवानगडावरील पंकजा मुंडे यांचा मेळावा असो यात आता आणखी एका मेळाव्याची भर पडली आहे. ती म्हणजे यावर्षीपासून नारायण गडावर ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नारायणगडावरून रणशिंग फुंकले असून जरांगेंनी या बैठकीत तशी घोषणा केली. या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज नारायणगडावर पार पडली. या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.
नारायणगडावरून जरांगेंनी फुंकले रणशिंग
राज्यात दसरा मेळाव्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे. बीडच्या सावरगाव घाट मध्ये पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. आता नारायणगडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आलीय. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे.
निवडणूकीच्या तोंडावर दुसऱ्या दसरा मेळाव्याची रूपरेषा
मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रात राजकीय घटनांना वेग आलेला असताना मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निवडणूका अवघ्या महिना दीड महिन्याने होण्याची शक्यता असताना मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केल जाणार आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे ? याबाबतचे नियोजन करण्यासाठी आज श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरवल्याची माहिती आहे. निवडणूकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार आहे.
पुढील लढाई निवडणूकीची
आठवडाभर उपोषण करुनही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले होते. त्यानंतर आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची घोषणा झाल्यानं विधानसभा निवडणूसाठी मनोज जरांगे यांनी रणशिंग फुंकल्याचं दिसतंय.