बीड : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून बीड जिल्ह्यातही 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या बीड लोकसभा (Beed) मतदारसंघात राजकारण तापलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांकडून या मुद्दयासंदर्भात भाष्य केले जाते. दरम्यान, पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) बीड जिल्ह्याच्या नेकनूर येथील सभेत मराठा समाजाला आवाहन करताना नाव न घेता शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. गेली 60-65 वर्षे हे झोपले होते का, आता आरक्षणच्या मुद्द्याला मुखवटा बनवून राष्ट्रवादीचे लोकं मतं मागत आहेत. गेल्या 50-60 वर्षे त्यांना कधीच वाटलं नाही, जातीचं बघावं, असे म्हणत पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्लबोल केला. 


काळजावर हात ठेऊन सांगा, मी कधी जातीवाद केलाय का?, असा सवाल पंकजा यांनी उपस्थितांना उद्देशून केला. अहिल्यादेवींनी जसा राज्य कारभार केला, जिजाऊंनी जसं शौर्य दाखवलं, जसं धैर्य सावित्रीबाई फुलेंनी वापरलं. तसेच, शौर्य, धैर्य आणि औदार्य दाखवण्याची गरज आता महिला भगिनींवर आली आहे. माझ्या जिल्ह्याच्या बंधुभावाची, माझ्या जिल्ह्याच्या सुंदर सलोख्याची तस्करी करण्याचे प्रयत्न हाणून पाडा, असे म्हणत पंकजा यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर निशाणा साधला. 


पंकजा मुंडेंनी ट्रोलर्संनाही सुनावलं, कुणी ट्रोल केलं, फेसबुकवर आपल्यावर कमेंट केली तर आपल्याला गोळी लागते का?. ट्रोलर्संकडे लक्ष देऊ नका, ती किरायानं आणलेली माणसं असतात. आता आरक्षणच्या मुद्द्याला मुखवट बनवून राष्ट्रवादीचे लोकं मतं मागत आहेत. गेल्या 50-60 वर्षे त्यांना कधीच वाटलं नाही, जातीचं बघावं असे म्हणत पंकजा यांनी नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल केला. 


जरांगेंच्या त्यागाचा आम्हाला आदरच


आरक्षणाचा हिरो कोण आहे?, हो जरांगे पाटील आहेत. त्यांची भक्ती करा ना, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जा, त्यांच्या पोस्ट टाका, त्यांचं त्याग, बलिदान, त्यांचं कष्ट याचा आम्हाला आदरच आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले ते भाजप सरकारनेच दिलं. मात्र, ह्यांच सरकार ते आरक्षण कोर्टात टिकवू शकले नाहीत. गेली 60-65 वर्षे झोपले होते का, त्यामुळे या भुलथापांना बळी पडू नका,असे आवाहन पंकजा मुंडेंनी नेकनूर येथील जाहीर सभेतून बीडकरांना केलं. 


आरक्षणाची काळजी मीच घेईन


प्रीतमताईंची हॅटट्रीक व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सांगितलं ना, एनडीए आणि भाजपने गोपीनाथ मुंडे के सपने साकार करने के लिए बेटी पंकजा को दिल्ली भेजने का निश्चित केलाय. मग, त्यांनीच मला बेटी म्हटलंय मग, तुमचीही काळजी मीच घेईल. आरक्षणाचीदेखील काळजी मीच घेईन, दुसरं कोणी घेणार नाही, असे म्हणत मराठा समाजालाही पंकजा मुंडेंनी साद घातली.


बीडसाठी 10 हजार किमीचे रस्ते


दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंकजा मुंडेंनी नितीन गडकरी व दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या. मला आठवतं की, 2009 साली गोपीनाथ मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी, अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी प्रचारासाठी आले होते. राजनाथसिंह हेही निवडणूक प्रचारासाठी आले होते. आम्ही ज्यांना पाहून लहानाचे मोठे झालो, त्यांना आम्ही नेता मानत नाही, त्यांना काका म्हणतो. 10 हजार किलो मीटरचे राष्ट्रीय महामार्ग गडकरी साहेबांनी आपल्याला दिले, मी केवळ 2014 मध्ये एक कागद गडकरीसाहेबांकडे दिला, त्यानंतर ही कामे झाल्याचं पंकजा यांनी म्हटलं. 


गडकरींकडे मागणी


10-10 लाख लोकं येथून उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतात, त्यामुळे या मतदारसंघात एक मोठा उद्योग उभारुन येथील तरुणाईच्या हाताला काम द्यावं, माझ्या ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी या जिल्ह्यात एक मेडीकल कॉलेज द्यावं, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे.