Beed: धनंजय मुंडेंविरोधात परभणीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दुसरा गुन्हा दाखल झालाय. याआधी मुंडे समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या केल्यानंतर जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर जर देशमुख कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दिला होता.
मुंडे समर्थक आक्रमक, जरांगेंवर सलग दुसरा गुन्हा दाखल
धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला गेला. याच्या निषेधार्थ रविवारी सकाळपासून परळी पोलिस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने मुंडे समर्थक जमा झाले आणि घोषणाबाजी केली. मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
मनोज जरांगे,अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी बीड मधील ओबीसी समाजबांधव तसेच मुंडे समर्थक हे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले होते. या ठिय्या आंदोलनात त्यांच्याबरोबर महिला देखील सामील झाल्या. अखेर पहाटे 3 वाजता मनोज जरांगे यांच्यावर अदकलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.दरम्यान आंदोलकांसोबत गुणरत्न सदावर्ते, लक्ष्मण हाके यांनी फोनवरून साधला संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे?
परभणीच्या मोर्चामध्ये बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते की, "धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला."
हेही वाचा: