जालना : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. वाल्मिक कराड आणि आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी आष्टीचे आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. दरम्यान, वाल्मिक कराड आणि हत्याप्रकरणातील आरोपींना मंत्री धनंजय मुंडेंचा पाठबळ असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली. आमदार सुरेश धस यांनी खंडणीप्रकरणात थेट धनजंय मुंडेंवर आरोप करत, त्यांच्या बंगल्यावर बैठका झाल्याचं म्हटलं होतं. मात्र, दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे आणि सुरेश धस (Suresh dhas) यांची बैठक झाल्याचं समोर आल्यानंतर आता आमदार धस यांच्याविरुद्ध सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Jarange patil) यांनीही तीव्र शब्दात मुंडे-धस भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. आता, पुन्हा एकदा जरांगे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हा विषय माझ्यासाठी संपला असल्याचे म्हटले.
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर चोहोबाजुंनी टीका व्हायला लागल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी हे माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचे म्हटले. आमदार धस यांच्या या आरोपावर आता मनोज जरांगे पाटील यांनीच थेट हल्ला चढवला आहे. ''तुमच्यावर बळच षडयंत्र केलं असत आणि तुम्हाला बळच बदनाम करायला लागले असते तर आम्ही ठासून तुमच्यासोबत सगळे उभा राहिलो असतो. पण, षडयंत्र काय? तुम्ही भेटायला गेलात,आता सपादनी करून काय उपयोग?. तुम्ही मराठ्यांची जी फसवणूक करायची नव्हती ती केली, गोड बोलून तुम्ही मराठ्यांचे मुंडके मोडून टाकले,ही अपेक्षा नव्हती,'' अशा शब्दात मराठा आंदोलक आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी नुसतं पाडलं म्हणून हे शुभेच्छा द्यायला तयार नव्हते. पाडलं तरी कुठं, मराठ्यांनी ह्यांना पडू दिलंच नाही. तरीही, तुम्ही खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाता, आणि म्हणता मला बदनाम करायले. तुम्ही भेटायला गेलात यात षडयंत्र काय? माझ्यासाठी तो विषय संपवायचा आहे. इतका मोठा दगा आणि धोका धसांकडून होईल, ते मराठ्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. मराठ्यांचा संयम सुटला तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांना इशाराच दिला आहे. तसेच, ही चाल चांगली नाही, असेही जरांगे यांनी म्हटलं.
हेही वाचा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ