Manoj Jarange Patil Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचा निकष लावून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंबही न गेल्याने आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे आता झोपून असले तरी शनिवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे याठिकाणी तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. आणखी काही काळ मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु राहिल्यास त्यांची प्रकृती वेगाने ढासळू शकते. त्यामुळे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने काही हालचाली करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कालच मुंबईत मराठा उपसमितीची बैठक पार पडली होती. त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना जाऊन भेटले होते. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले होते. हे शिष्टमंडल माघारी परतल्यानंतर शनिवारी रात्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. याठिकाणी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यानंतर गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील गुपचूप वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडले.
Maratha Reservation: मराठा उपसमितीची आज महत्त्वाची बैठक
मंत्रिमंडळ मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास वर्षा या निवासस्थानी त्यांनी चर्चा केलीय. यावेळी विखे पाटील यांनी न्यायमूर्ती शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. काल मराठा उपसमितीची शिंदे समिती सोबत बराच वेळ चर्चा झाली होती. त्याशिवाय उपसमितीच्या सुद्धा दोन बैठका झाल्या होत्या. जरांगे पाटील यांच्या मागण्या पाहता सरकार यातून कोणता मार्ग काढणार? हे पहावे लागेल. आज सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा उप समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. ज्यामध्ये सखोल चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. त्यात आज आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आझाद मैदान आणि आसपास परिसरात राहणाऱ्या आंदोलकांची खाण्याची व्यवस्था राज्यभरातील मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे. सकाळचा नाश्ता वाटप सध्या महानगरपालिके समोर सुरू आहे. केळी, सफरचंदे वाटप होत आहे. अनेक टेम्पोतून सध्या नाश्ता वाटप सुरु आहे.
आणखी वाचा
Maratha Reservation LIVE: मनोज जरांगेच्या मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस, तब्येत खालावली, तोडगा निघणार?