ठाणे : बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून येथील शाळेवर राज्य सरकारने प्रशासक नेमले आहे. एका आदर्श शाळेतील चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले, आंदोलकांनी आरोपीला आजच फाशी द्या, अशी मागणी करत रेल्वे स्टेशवर रास्ता रोको केल्यामुळे 7 ते 8 तास रेल्वेमार्ग बंद राहिला होता. त्यानंतर, पोलिसांनी लाठीचार्ज करुन आंदोलकांना पळवून लावले. मात्र, या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले अन् राज्यभर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं. त्यानंतर, विविध राजकीय नेतेमंडळी बदलापूरला जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत आहे. आता, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी बदलापूरला भेट दिली. 


बदलापूर बंद आंदोलनाची दखल घेत मंत्री गिरीश महाजन, विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बदलापूरला भेट दिल्यानंतर आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही बदलापूरला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी, उद्याच्या बंदसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उद्याचा महाराष्ट्र बंदला आरपीआय उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पाठींबा दिला होता. मात्र, आरपीआय महायुतीत आहे, त्यामुळे, आरपीआयकडून बंदला पाठिंबा नाही, असे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी दिले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना बंद पुकारण्यात येत नसल्याचे सांगत निर्देश दिले होते. त्यानंतर, सर्वच पक्षांनी बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे, उद्या कुठेही बंद असणार नाही.  


बदलापुरात घडलेली घटना अंत्यत दुर्दैवी आणि गंभीर तसेच मानवतेला कलंक लावणारी आहे. या देशातील महिला सुरक्षित तर नाहीच पण लहान मुली देखील सुरक्षित नाहीत, अशा प्रकारची मेंटॅलिटी पाहायला मिळत आहे.  या शाळेचे नाव आदर्श आहे, पण त्याचा आदर्श कसा ठेवायचा अशी ही संस्था आहे. आतापर्यत या शाळेने शिक्षणात चांगले काम केले आहे. मात्र,  मुलींना ज्या ठिकाणी शौचालयाला पाठवले होते, तिथे आयांना पाठवणे अंत्यत गरजेचं होतं. या घटनेला शाळेतील संस्था पूर्णपणे जबाबदार आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले. तसेच, आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे,  आरोपीला अजून कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या घटनेनंतर बदलापूर शहराच नाव तसेच ठाणे जिल्हाच नाव संपूर्ण देशात बदनाम झालं आहे, या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. पोलीस अधिकारी शुभदा शितोळे यांची बदली झाली असली, तरी ती रद्द करणार असून त्यांचं निलंबन कायम राहणार असल्याचेही आठवले यांनी म्हटले.  


वामन म्हात्रेवर कारवाई होणार


महिला पत्रकारावर केलेल्या टीपण्णीबाबत बोलताना, वामन म्हात्रे हा कुठल्या पक्षाचा आहे, ते महत्वाचे नसून टो एक व्यक्ती आहे आणि त्याने एका महिला पत्रकारासोबत असं भाष्य करणं चुकीचे आहे. वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे, वामन म्हात्रेला अटक होणार. कायदा सर्वाना एकसमान आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई होणार असेही आठवले यांनी म्हटले.