Satish Chavan: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सतीश चव्हाण (Satish Chavan) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी चार वाजता सतीश चव्हाण पत्रकार परिषद घेणार आहेत. हा अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.


सतीश चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार आहेत. ते गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. थोड्याच वेळात सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.  गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आहेत. 


गंगापूर विधानसभा निवडणुकीत 2019 ला काय घडलेलं? 


गंगापूरमध्ये 2019 ची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. प्रशांत बंब हे त्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने पाटील आणि वंचितचे अंकुश कळवणे होते. प्रशांत बंब यांना 107193 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या माने पाटील  यांना 72222 मतं मिळाली होती. वंचितच्या अंकुश कळवणे यांना 15951 मतं मिळाली होती. 


पक्षविरोधी काम केल्यामुळे सतीश चव्हाण यांना केलं होतं निलंबीत 


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे इच्छुकांच्या पक्षबदलाच्या बातम्याही समोर येत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाने पक्षविरोधी काम केल्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.  जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याच ठपका ठेवत आमदार चव्हाण यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबतचा आदेश काढला होता. सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारवर टीका देखील केली होती. महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, असे सतीश चव्हाण यांनी म्हटले होते. चव्हाण यांनी थेट पत्र लिहून आपली भूमिका जाहीर केली होती. मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली होती.