Maharashtra Politics Crisis : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिल्याच जाहीर कार्यक्रमात काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर चांगलीच तोफ डागली. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? असं अजित पवार म्हणाले. ज्यातून सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) शरद पवारांनी जे काही दिले ते आपल्याला मिळाले नसल्याची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली होती. मात्र हीच खंत पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अजित पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपप्रसंगी परळीमध्ये बोलून दाखवली होती. 


राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती झाल्यावर पहिल्याच सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी शरद पवारांवर थेट निशाणा साधला. आता तुमचं वय झाले असून, तुम्ही कधी थांबणार की नाही? असा प्रश्न विचारला. तसेच शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तो पुन्हा मागे घेतल्याच्या निर्णयावरून देखील अजित पवारांनी टीका केली. सोबतच जर राजीनामा मागेच घ्यायचा होता तर दिला होता कशाला? असा सवाल अजित पवार यांनी थेट जाहीर कार्यक्रमात शरद पवारांना केला. पण जशी भूमिका अजित पवारांनी मांडली तिच भूमिका पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडेंच्या बाबत मांडली होती.  


"माझा जन्म गोपीनाथ मुंडेंच्या पोटी झाला नाही”


बुधवारी झालेल्या बैठकीत ज्या पद्धतीने अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यावर टीका केली, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडे यांना त्यांच्याजागी उमेदवारी मिळाली. त्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे हा संघर्ष वाढत गेला. पुढे धनंजय मुंडेंना विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये पराभव पत्करावा लागला. याच पराभवाची सल धनंजय मुंडेंमध्ये बोचत होती.


दरम्यान, याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 मध्ये शिवस्वराज्य यात्रा राज्यभर काढली. विशेष म्हणजे, या यात्रेचा समारोप परळीमध्ये झाला. या समारोपाच्या भाषणामध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी अजित पवारांप्रमाणे आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचला होता. तसेच माझा जन्म गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी झाला नाही म्हणूनच, जे पंकजा मुंडे यांना मिळाले ते आपल्याला मिळाले नाही का? अशी खंत बोलून दाखवली होती. आता तशीच काही खंत अजित पवारांनी बोलून दाखवली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ajit Pawar: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळेंवर निशाणा