Abdul Sattar: नेहमी आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत येणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी आता नवीन वक्तव्य करत वाद ओढावून घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यावर पदवी मिळत असली तरी सर्वांना काही नोकऱ्या मिळणार नाहीत असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तरुणांना रोजगार देऊन स्वतः पायावर उभे करण्याचं काम केलं जाईल, असे म्हणत असतानाच सत्तार यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावेळी ते बोलत होते. 


"आता पदवी मिळाली आहे, पण सर्वाना काही नोकऱ्या मिळणार नाहीत”, असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभमध्ये केले. पण यानंतर या वक्तव्यामुळे काय गोंधळ झाला हे लक्षात आल्यानंतर सत्तार यांनी सारवासारव केली. 'तुम्हा पदवीधारकांसाठी राज्य सरकार 75  हजाराची नोकरभरती करत आहे. त्यामध्ये नक्की नोकरी मिळेल' असे म्हणत आधी झालेली चूक सुधारण्याचा सत्तार यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांची सारवासारव पाहून उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला होता.


नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता! 


अब्दुल सत्तार आणि वाद हे काही नवीन नाही. मात्र आधीच राज्यातील बेरोजगारांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरवर्षी लाखो मुलं पदव्या घेऊन विद्यापीठातून बाहेर पडतात. मात्र त्यांना नोकरी मिळत नाही. अशावेळी सरकराने रोजगार उपलब्ध करून द्यावे आणि शासकीय नोकऱ्यांच्या जागा भरण्यात याव्यात अशी मागणी सतत केली जाते. पण असे असताना राज्यातील एक जबाबदार मंत्री सर्वांना काही नोकऱ्या मिळणार नाहीत, असे वक्तव्य करत असल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर यावरून पुन्हा एकदा विरोधक सत्तार यांच्याविरुद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


आम्ही वेगळा प्रयोग केला आणि मी कृषीमंत्री झालो....


दरम्यान पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मराठवाड्याचा कृषीमंत्री होईल असे मला वाटले नव्हते. पण आम्ही एक प्रयोग केला. तो यशस्वी झाला आणि मी कृषीमंत्री झालो. यासह जोरदार राजकीय फटकेबाजी देखील अब्दुल सत्तार यांनी दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावेळी केली आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि दापोली कोकण कृषी विद्यापीठच्या कुलगुरूसह इतर मान्यवर देखील हजर होते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Abdul Sattar : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमधील 51 हजार 644 शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा निधी रखडला