Devendra Fadnavis : महाराष्ट्र सरकारने बंद केलेल्या बुलेट ट्रेनची कामे सुरू केली तर इतर बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होईल आणि त्यामुळे मराठवाड्यातील बुलेट ट्रेनचे स्वप्न साकार होइल. यासाठी राज्याचे जबाबदार मंत्री असलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांना विनंती करावी. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते


सगळे रेल्वे प्रकल्प बंद पडले


रेल्वे प्रकल्पाकरता 50% निधी हा राज्याने द्यायचा असतो, तो राज्याने देणे बंद केल्यामुळे, सगळे रेल्वे प्रकल्प बंद पडले आहेत. तोही निधी राज्याने देणे सुरू केले तर राज्यातील सगळे प्रकल्प मार्गी लागतील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.


राज ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य


दरम्यान काल यवतमाळमध्ये देवेंद् फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिलीय, ते म्हणाले, "राज ठाकरे यांचं म्हणणं खरं आहे. क्रमांक एकचा भाजप पक्ष सत्तेच्या बाहेर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यवतमाळ इथे काल (2 एप्रिल) आमदार मदन येरावार यांच्याकडे आले असता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य केलं. परंतु राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण न ऐकल्याने जास्त बोलणं  योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


राज ठाकरेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
मुंबईतील शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारांसोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही," असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. आज महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.