मुंबई: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत 18 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. लाडक्या बहिणीसाठी पैसे कमी पडू नये, यासाठी अन्य सर्व योजनांचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. हा आरोप खरा आहे की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना वाटलेल्या गणवेशाच्या (School Uniform) दर्जावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारी शाळांमधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचा दर्जा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते.


या मुद्द्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चीड व्यक्त केली आहे. अंबादास दानवे यांनी एक्स या समाजमाध्यमावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एका शाळकरी विद्यार्थ्याचा गणवेशातील फोटो ट्विट केला आहे. यामध्ये संबंधित लहान मुलाच्या गणवेशाची अवस्था पाहण्यासारखी आहे. याच मुद्द्यावरुन अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षणमंत्री  दीपक केसरकरजी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवल्याचा टोला दानवे यांनी लगावला आहे.




15 ऑगस्ट 2024 पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत.  ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली आहे. यावर आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि महायुतीचे मंत्री काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल. मात्र, या घटनेमुळे सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी इतर महत्त्वाच्या योजनांचा निधी थांबवल्याच्या विरोधकांच्या दाव्याला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सरकार यादृष्टीने काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.


आणखी वाचा


मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा