Lok Sabha Elections 2024 Latest News: नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 चा (Lok Sabha Election 2024) अंतिम टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी मतदारांना विशेष आवाहन केलं आहे. मनमोहन सिंह यांनी गुरुवारी (30 मे 2024) एक पत्रक जारी करून पंजाबच्या (Punjab Lok Sabha Election 2024) जनतेला हे आवाहन केलं आहे. मतदानाच्या अंतिम फेरीत, निरंकुश राजवटीचा अंत करून आपल्या लोकशाहीचे आणि आपल्या संविधानाचं रक्षण करण्याची आपल्याकडे शेवटची संधी आहे, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले आहेत. तसेच, 10 वर्षांत भाजपनं पंजाबला बदनाम केलंय, असंही ते म्हणाले आहेत. 


डॉ. मनमोहन सिंह यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे की, माझ्या प्रिय नागरिकांनो, भारत एका गंभीर वळणावर उभा आहे. मतदानाच्या अंतिम फेरीत, निरंकुश राजवटीचा अंत करून आपल्या लोकशाहीचे आणि आपल्या संविधानाचं रक्षण करण्याची आपल्याकडे शेवटची संधी आहे. पंजाब आणि पंजाबी हे योद्धे आहेत. आपण आपल्या त्याग आणि बलिदानासाठी ओळखले जातो. आपले अदम्य धैर्य आणि सर्वसमावेशक, सौहार्द, सद्भाव आणि बंधुत्वाच्या लोकशाही मूल्यांवरचा जन्मजात विश्वास आपल्या महान राष्ट्राला वाचवू शकतो.


10 वर्षांत भाजपनं पंजाबला बदनाम केलं : मनमोहन सिंह 


मनमोहन सिंहांनी पत्रात पुढे लिहिलंय की, गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारनं पंजाब आणि पंजाबींना बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. पंजाबचे 750 शेतकरी शहीद झालेत. शेतकरी सलग तीन महिन्यांपर्यंत दिल्लीच्या सीमांवर वाट पाहत होते. सरकारनं त्यांच्यावर हल्ले केले. शेतकऱ्यांना संसदेत आंदोलनजीवी आणि परजीवी म्हटलं गेलं. 


2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं मोदींनी वचन दिलेलं, पण... : मनमोहन सिंह 


मनमोहन सिंह म्हणाले की, 2022 पर्यंत आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं. पण, उलट गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालं आहे. आपली शेती, कुटुंब उद्ध्वस्त केलीत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. यावेळी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात 'शेतकरी न्याय' अंतर्गत 5 हमीभाव आहेत. काँग्रेसनं एमएसपीची कायदेशीर हमी, शेतीसाठी स्थिर निर्यात-आयात धोरण, कर्जमाफी आणि इतर अनेक घोषणा जाहीर केल्या आहेत.


मनमोहन सिंह यांनीही पत्रात मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, गेल्या 10 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. नोटाबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय यामुळे दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात जीडीपीचा सरासरी वाढीचा दर 6 टक्क्यांहून कमी राहिला आहे, तर काँग्रेस-यूपीएच्या कार्यकाळात तो 8 टक्क्यांच्या आसपास होता.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज संध्याकाळी प्रचार थांबणार असून 1 जूनला अखेरच्या टप्प्यात 8 राज्यांत 57 जागांवर मतदान पार पडणार आहे.