सोलापूर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला. महाराष्ट्रात मविआने महायुतीला धोबीपछाड केले. आता राजकीय विश्लेषक यावर विचारमंथन करतील. पराभवाची कारणे समोर येईल. बीडमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचे कारण मनोज जरांगे (Manoj Jarange) फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सोलापूर (Solapur) आणि माढा (Madha) लोकसभा मतदारसंघात फक्त मनोज जरागेंचा इफेक्ट दिसला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना 45420 मत तर मोहोळ मतदारसंघातून 63152 मतांचे असे एकूण 1 लाख 8572 मतांचे मताधिक्य दिले आणि यामुळेच हा विजय झाला.
माढा आणि सोलापुरात मराठा समाजाचा रोष भाजपला भोवला
माढा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आ बबनराव शिंदे यांचा बालेकिल्ल्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना तब्बल 52515 मतांचे तर करमाळा येथे अजित दादा गटाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघातून 41511 मतांचे मताधिक्य मिळाले. ज्या सांगोला मतदारसंघात मोहिते पाटील 25 हजारांनी मागे राहणे अपेक्षित होते तेथेही जरांगेमुळे केवळ 4482 मतांनी मागे राहिले. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा रोष भाजपला भोवला आणि जोडीला मुस्लिम व मागासवर्गीय यांनी केल्या विरोधी मतदानामुळे भाजपाच्या हातून या दोन्ही जागा गेल्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठवाडा धुमसतोय?
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठवाडा धुमसत होता. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा युती सरकारने काढला नाही, अशी समाजाची भावना आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठा समाजाने आपली ताकद मराठा समाजाने दाखवून दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमधून सुरुवात केली. अंतरवली सराटीत त्यांनी उपोषण केले. त्यांच्या उपोषणस्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले. परंतु त्यांची सगेसोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला. मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे.