नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदार संघात मतदान सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातील तीन मतदारसंघात आज मतदान पार पडतंय. नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी, जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर, रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील लोकसभेच्या रिंगणात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील या तीन मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
नंदुरबारमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात जोरदार मतदान
राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान नंदुरबार लोकसभा मतदारसंघात झालं आहे. सकाळी 9 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नंदुरबारमध्ये 8.43 टक्के मतदान झालं. तर, जळगाव लोकसभा मतदारसंघात 6.14 टक्के मतदान झालंय. रावेर लोकसभा मतदारसंघात 7.14 टक्के मतदान झालंय.
पुणे लोकसभा मतदारसंघात 6.61 टक्के मतदान झालंय. शिरुर लोकसभा मतदारसंघात 4.97 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. मावळमध्ये 5.38 टक्के मतदान झालं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 7.25 टक्के मतदान पार पडलं. तर, बीडमध्ये 6.72 टक्के मतदान झालंय.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात 6.83 टक्के मतदान पार पडलं आहे. तर, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 5.13 टक्के मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत झालं आहे.
मतदानानंतर एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे काय म्हणाल्या?
निवडणूक म्हटलं की आव्हान असतंच. रक्षा ताईंनी रावेरमध्ये चांगले काम केले आहे. सध्या रक्षा खडसे यांच्या बाजूनेच रावेरमध्ये वातावरण आहे. त्यामुळे या जागेवर रक्षा खडसे याच निवडून येतील, असे मला वाटते असे एकनाथ खडसे म्हणाले.
रोहिणी खडसे यांनी लोकशाहीमध्ये मतदान महत्त्वाचे आहे. मी माझ्या मतदानाचं कर्तव्य पार पाडले आहे, असं म्हटलं. महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने रावेरमध्ये विजयी होईल, असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत असताना छत्रपती संभाजीनगर, बीड आणि पुण्यात इव्हीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मतदान खोळंबलं होतं.
संबंधित बातम्या :
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना