Laxman Hake on Manoj Jarange Patil & Suresh Dhas : बीड (Beed) जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा, विचारवंतांचा आणि वारकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख असलेला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी येथे जातीवादाची टोकाची दरी निर्माण झाली आणि याला कारणीभूत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे होते, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे.
ज्या दिवशी मनोज जरांगे यांच्यावरचा मीडियाचा कॅमेरा हटेल तेव्हापासून पुन्हा येथील जातीय दरी कमी होण्यास सुरुवात होईल, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. बीडची परिस्थिती पूर्वपदावर आणायची असेल तर येथील लोकप्रतिनिधींची एक सभा मुख्यमंत्र्यांनी बोलावून त्यांना त्यांच्या राजधर्माची आठवण करून दिल्यास हे प्रकार कमी होतील, असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर बीड जिल्ह्यातील कोणताही आमदार जाणार नसून तसे झाल्यास बीड मधील गुंडगिरी आणि दडपशाही संपून जाईल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
सुरेश धस हेच खोक्याचे आका
तर लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. सुरेश धस खोक्याचा आका असून आता धस राजीनामा देणार का? असा सवाल त्यांनी केलाय. सुरेश धस यांनी पारध्यांच्या टोळ्या पाळल्या आहेत, असा आरोप त्यांच्या मतदारसंघातील जनता करते, असे सांगत खोक्याचे घर पाडल्यावर तिथे गेलेले धस हेच त्याचे आका असल्याचा घणाघात हाके यांनी केला आहे.
धस यांच्यापासून भाजपने सावध राहावे
खोक्याची गुंडगिरी, दडपशाहीचा वापर कोण करून घेत होतं, असा सवाल करीत त्यांच्या निवडणूक काळात शंभर गाड्यांची रॅली असेल किंवा कोणाला मारहाण करायची असेल तर हाच खोक्या धस यांना लागायचा. खोक्याचे घर पाडले म्हणून अश्रू ढाळणारे धस यांनी कधी विधानसभेत याच पारधी समाजाच्या घरकुलासाठी मागणी केली का? असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी केलाय. बीड जिल्ह्यातील सोळंके, धस, क्षीरसागर हे सर्व आमदार एकाच माळेचे मणी असल्याचे सांगत सर्वांची प्रकरणे आता बाहेर येऊ लागली आहेत. धस यांच्यापासून भाजपने सावध राहावे, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस यांच्यावर केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या