Continues below advertisement

Khed Nagarparishad Election 2025: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अगदी स्थानिक स्तरावर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये (Local Bodies Election) राजकीय पक्षांच्या आघाडीत मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका महायुतीला (Mahayuti) बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून कोकणात महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होताना दिसत आहे. यामध्ये आता खेड नगरपरिषदेची भर पडली आहे. खेड नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून रामदास कदम आणि योगेश कदम यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता नव्यानेच भाजपमध्ये आलेल्या आणि पूर्वाश्रमीचे मनसैनिक असलेल्या वैभव खेडेकर (Vaibhav Khedkar) यांच्याकडून कदम पितापुत्राच्या वर्चस्वाला आव्हान देण्यात आले आहे. युतीच्या घोषणेआधीच खेडमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारा ठरल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

नव्याने भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्याकडून त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख असलेले फोटो व्हॉटसअॅप स्टेटसला ठेवण्यात आले आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेकडून माधवी बुटाला यांचे नाव खेडच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आघाडीवर आहे. महायुतीमधील दोन महत्वाच्या पक्षांकडून वेगवेगळे उमेदवार समोर आल्यामुळे आता याठिकाणी महायुतीमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वीच वैभव खेडेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर वैभव खेडेकर यांना बराच काळ भाजप प्रवेशासाठी तिष्ठत राहावे लागले होते. अखेर भाजपमध्ये प्रवेश होताच वैभव खेडेकर जोमाने कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच खेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी जाहीरपणे वैभव खेडेकर यांना जुने वाद विसरुन महायुतीसोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, आता त्याच वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच कदम पितापुत्राच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. त्यामुळे आता वैभव खेडेकर यांची पत्नी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरल्यास शिंदे गट काय पाऊल उचलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Ratnagiri news: कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार, नितेश राणेंनी सामंतांना ललकारलं

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येताच महायुतीत वाद निर्माण झाले आहेत. सिंधुदुर्गात भाजपने स्वबळावर लढावे, यासाठी नितेश राणे आग्रही आहेत. यावर शिंदे गटाच्या उदय सामंत यांनी त्यांना टोला लगावला होता. कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले होते. यावर नितेश राणे यांनी म्हटले की, कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत. कार्यकर्त्याला सन्मानजनक वागणूक मिळते का नाही हे पाहणं भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

आणखी वाचा

सिंधुदुर्गात नारायण राणे भाजप-शिवसेनेच्या युतीसाठी आग्रही, पण नितेश राणे स्वबळावर अडून बसले; महायुतीत नेमकं काय घडतंय?